द न्यूज बिज् टीम, पुणे
पुण्यात औंध येथे आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन कार्यालयाचे उद्घाटन माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे व आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर मुजुमदार यांच्या हस्ते आणि आप महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आप वाहतूक विंग राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, आप पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, आप पुणे संघटन मंत्री डॉ. अभिजीत मोरे, आप पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश खोपडे म्हणाले, की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जाऊन उद्धव ठाकरे यांचे सरकार आले, तरी सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये फारसे बदल झाले नाहीत. कारण व्यवस्था परिवर्तन हा अजेंडा प्रस्थापित पक्षांचा नाही. आम आदमी पक्षाकडे परिवर्तन घडवण्यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि दिल्लीमध्ये प्रत्यक्ष बदल घडवून दाखवल्याचा अनुभव गाठीशी आहे. आम आदमी पक्षाला येत्या काळामध्ये परिवर्तनाचा कार्यक्रम, तो राबवण्यासाठीची व्यूहरचना आणि शिस्तबद्ध प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
आप पक्षाचे 75 वर्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर मुजुमदार यांनी आम आदमी पक्षामध्ये समाजामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवण्याची, भ्रष्टाचाराला रोखण्याची क्षमता असल्यामुळे माझ्या सारख्या ज्येष्ठ नागरिकाला देखील पक्षकार्यामध्ये वाहून घेण्याची प्रेरणा मिळते.
पुण्यातील आप महाराष्ट्र प्रदेश संघटन कार्यालय हे राज्यभरातील सर्व आप कार्यकर्त्यांसाठी दैनंदिन संपर्क कार्यालय असणार आहे. येत्या काळात राज्यातील महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे केंद्र असणार आहे. पुण्यासह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका आम आदमी पक्ष लढवणार आहे, असे राज्य संघटक विजय कुंभार म्हणाले.







Leave a Review