अनंतनगर मित्रमंडळाच्या गणेशमूर्तीचे फुलांची आकर्षक सजावट केलेल्या हौदात विसर्जन

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी :

दरवर्षी गणराज वाजतगाजत येतात व वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांना निरोपही दिला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार गणरायाला निरोप दिला. पिंपळे गुरव येथील अनंतनगर मित्रमंडळाच्या वतीनेही अगदी साध्या पद्धतीने फुलांची आकर्षक सजावट केलेल्या विसर्जन हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

 

मंडळाच्या वतीने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. मोठ्या भक्तिमय वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..” अशा जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

अनंतनगर तरुण मित्रमंडळ पुढील वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून, त्यानिमित्त पुढील वर्षाच्या बॅनरचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार आहेत.

पुढील वर्षाच्या बॅनरचे यावेळी उद्घाटन करण्यात आले

‘हे विघ्नहर्त्या, सर्व दु:खाचे तू निवारण करून आम्हाला भयमुक्त जीवन दे. पुढच्या वर्षी मांगल्याच्या चिन्हांसह आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तू ये’, अशा आशयाचे मागणे मागत श्रीगणेशाच्या जयकारात गणरायाला भावूकतेने निरोप दिला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर संमिश्र भावनांमध्ये अडकलेल्या आम्हा भाविकांच्या आयुष्यात नवा आशावाद पेरत गणरायाच्या मूर्तीने मायेची पखरण केली. लाडक्या बाप्पाला निरोप देताना मंडळाच्या कार्यकर्त्यांसह चिमुकल्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.


Share this Newz