भाजप संलग्न नगरसेवक कैलास बारणे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या जेष्ठ नगरसेविका माया बारणे यांचे पती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे व भाजपच्या पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29 च्या नगरसेविका, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता सत्ताधारी भाजपशी संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

कैलास बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. कैलास बारणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संतोष बारणे, अभय मांढरे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ऋषिकेश काशिद, योगेश साळुंखे, प्रविण बारणे, शहाजी लोखंडे, अक्षय बारणे, तुषार मोरे आदी उपस्थित होते.

कैलास बारणे हे 2017 च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. चार सदस्यांचा मोठा प्रभाग असतानाही बारणे हे प्रभाग क्रमांक 23 थेरगाव गावठाणमधून अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी पाच अपक्ष नगरसेवकांची आघाडी केली. या आघाडीने भाजपला पाठिंबा दिला.

ते स्थायी समितीचे सदस्य देखील होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्याला पदाची कोणतीही अपेक्षा नसल्याचे सांगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असल्याचे बारणे यांनी सांगितले.


Share this Newz