The Newz Biz Team, PUNE
कोविड-19 वैश्विक महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा संपूर्ण समाज घटकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या युवकांच्या उत्साहपूर्ण जीवनशैलीवर या महामारीचा नकारात्मक परिणाम झाला असून युवा वर्गाची जीवनशैली लक्षात घेता त्यांना आवश्यक जीवनपद्धती विषयी विचारमंथन करणे गरजेचे आहे, असे मत निवृत्त प्राचार्या डॉ. शर्मिष्ठा मटकर यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून इंग्रजी विभागाच्यावतीने ‘यूथ आणि कोविड-19’ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या व्याख्यानाचे उद्घाटन झाले. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संगीता घोडके, डॉ. माया माईनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्यानाचे प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कोविड-19 विषयी आयोजित व्याख्यानाचे उद्देश व महत्त्व उपस्थितांसमोर स्पष्ट केले. तसेच कोविड वैश्विक महामारीमुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असे नमूद करत शारीरिक, मानसिक, आर्थिक, बेरोजगारी या समस्यांनी ग्रस्त युवकांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित राहिलेल्या मुंबईच्या पाटकर वर्दे महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या डॉ. शर्मिष्ठा मटकर यांनी सर्वप्रथम कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेत सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या भारत, अमेरिका व ब्राझील या देशांमधील स्थितीची माहिती दिली. त्याचबरोबर कोरोनामुळे सर्वाधिक तरुणांचे प्रमाण असलेल्या भारतामध्ये विद्यार्थी व युवकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असे दुःख व्यक्त करत कोविड काळातील विविध देशांतील सकल राष्ट्रीय उत्पन्नांचा तुलनात्मक अभ्यास सादर केला. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, डिजीटल संस्कृतीचा उदय, प्रदूषणाचे कमी झालेले प्रमाण या कोरोनाच्या सकारात्मक परिणामाविषयी माहिती देत परप्रांतीयांचे स्थलांतर, युवकांमधील नैराश्य, घरगुती अत्याचारांमध्ये झालेली वाढ या नकारात्मक परिणामांकडे देखील लक्ष वेधले.
याप्रसंगी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कोविड काळामध्ये निर्माण झालेल्या विदारक परिस्थितीवर बनवलेल्या व्हिडिओचे सादरीकरण केले. यावेळी जागतिक स्तरावरील युवकांची अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
व्याख्यानानंतर डॉ. शर्मिष्ठा मटकर यांनी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांचे शंकानिरसन केले. डॉ. संगीता घोडके यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली.
या ऑनलाईन व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन भोसले, तर आभार प्रदर्शन डॉ. माया माईनकर यांनी केले.
कोविड-19 विषयक शासन नियमांचे पालन करत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये ६० तर झुम ॲप व यु-ट्युब लाइव्हद्वारे १२० असे सुमारे १८० विद्यार्थी व शिक्षक ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने या व्याख्यानासाठी उपस्थित होते. व्याख्यानाच्या तांत्रिक यशस्वीतेसाठी प्रा. सोनल कदम, प्रणित पावले, वीरेन चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







Leave a Review