The Newz Biz Team, PUNE
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी स्थापन झालेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा आज वटवृक्ष झाला आहे. अनेक थोर व्यक्तिमत्वांच्या त्याग व कार्यामधून उभ्या राहिलेल्या आणि आज घडीला पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबरच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची संधी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा शैक्षणिक प्रवास निश्चितच स्फूर्तीदायक आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी केले.

महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा ८० वा वर्धापन दिन तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालय व हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगवी ते हडपसर या ३३ किलोमीटर ज्ञानज्योत रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) ए.एम. जाधव, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उप प्राचार्य डॅा. लतेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) ए.एम. जाधव यांनी ज्ञानज्योत रॅली आयोजित करण्यामागे असलेले उद्देश व महत्व स्पष्ट केले. तसेच ८० व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेत वर्धापन दिनानिमित्त बाबुरावजी घोलप महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरसिंग गिरी तर आभार प्रदर्शन प्रा. विद्या पाठारे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्ये रॅलीचे आगमन झाल्यानंतर बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘लस घ्या हो लस’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करत जनजागृती केली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. दीपक माने यांची विशेष उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी विद्यार्थ्यांना क्रियाशील बनवणाऱ्या व समाजाला विचार करायला लावणारे विषयावर पथनाट्याचे आयोजन केल्याबद्दल प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा मोलाचा वाटा आहे असे नमूद करत कोविड – १९ मुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीवर भाष्य केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. दीपक माने यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना पथनाट्य सादर करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश एकार यांनी या पथनाट्याचे दिग्दर्शन तर डॉ. माया माईनकर यांनी पटकथा लेखन केले. या करिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. स्वामीराज भिसे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या पथनाट्यामध्ये दिनेश भगत, श्रावणी चितारे, मनिषा अवचिते, अश्विनी जाधव, राजेश मोरे, सागर केदारी, प्रतिक्षा रासकर, अजय कसब, रुपेश कदम, देविका काळे, श्रीराज भोईटे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. अमृता इनामदार, प्रा. सद्दाम घाटवाले तसेच प्रा. विजय घारे, डॉ. ज्ञानेश्वर महाजन, प्रा. अनंत पवार, डॉ. प्रवीण यावले, प्रा. विक्रम मालतुमकर, प्रा. प्रकाश पांगारे, प्रा. जितेंद्र वडशिंगकर, प्रणित पावले, सचिन शितोळे, अवधेश यादव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







Leave a Review