भाजपला आणखी एक धक्का ; माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नुकताच भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बारणे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

http://पिंपळे गुरवमध्ये भाजप नगरसेविकेचा पती राष्ट्रवादीत; आणखी भाजप निष्ठावंत पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत सविस्तर वृत्त 👇🏻 https://thenewzbiz.com/?p=5566

मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत बारणे यांनी आज (दि.०९) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अभय मांढरे उपस्थित होते.

संतोष बारणे हे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पत्नी माया बारणे या थेरगावमधून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर २०१७ मध्ये भाजपच्या चिन्हावर त्या निवडून आल्या आहेत. थेरगाव परिसरात त्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे पती संतोष बारणे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला एकापाठोपाठ एक धक्का सहन करावा लागत आहे.

आणखी काहीजण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे ही गळती कशी रोखायची याबाबत भाजप काय डावपेच आखते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


Share this Newz