पोलाद व तांब्यासह कच्च्या मालाच्या किमती 20-21 टक्क्यांनी वाढल्या; एसी, फ्रीजच्या किमती वाढण्याची शक्यता

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

पोलाद व तांब्यासह कच्च्या मालाच्या किमतीमध्ये 20-21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी एसी, फ्रिज, टीव्हीसारखे होम अप्लायन्सेस खरेदी करणे ४-५ टक्के महाग पडू शकते. तसेच मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशरसारख्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सच्या किमतीही सहा महिन्यांत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

व्हाइट गुड्स उद्योगाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, ६ महिन्यांत पोलाद, तांब्यासारख्या कच्च्या मालाच्या किमती २०-२१ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. याआधी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढल्या होत्या. यंदा पहिल्या सहामाहीत होम अप्लायन्सेसच्या किमती १२% पर्यंत वाढल्या आहेत आणि आताही ७-८% वाढीची शक्यता आहे. जुलैमध्ये ३-५% वाढ पाहायला मिळू शकते. अनेक कंपन्यांनी उत्पादनाच्या किमती एकदाच वाढण्याऐवजी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये थोड्या-थोड्या वाढवण्याची योजना आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अंड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे(सीएमा) अध्यक्ष व गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस हेड व ईव्हीपी कमल नंदी यांच्या म्हणण्यानुसार, कमोडिटीच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, काहीशी गुंतवणूक वाढल्यामुळे कूलिंग प्रॉडक्ट्स व होम अप्लायन्सेच्या किमती वाढवण्याचा उद्योगांना नाइलाज आहे.

कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत विक्रीत घट
वर्षातील सुरुवातीचे तीन महिने चांगले गेले. मात्र, त्यानंतर एप्रिल-जून व्हाइट गुड्स उद्योगासाठी योग्य राहिले नाहीत. उन्हाळ्यात पीक सीझनमध्येही एसी, फ्रिजची विक्री होऊ शकली नाही. सिएमाच्या सूत्रांनुसार, एप्रिलमध्ये होम अप्लायन्सेसची विक्री निम्मी झाली. मेमध्ये विक्री झाली नाही आणि जूनमध्ये जवळपास ७०% विक्री झाली. आता मान्सून आला आहे. परिणामी कूलिंग श्रेणीत विक्रीची जास्त अपेक्षा नाही.

किंमतीत वाढ करणे अपरिहार्य 
एसी, फ्रीज साठी लागणारा कच्चा माल विशेषतः स्टील, तांबे, अॅल्युमिनियमच्या किमतीत वाढ झाल्याने होम अप्लायन्सेस कंपन्यांना किमतीत वाढ करावी लागली आहे.  किमती तीन महिन्यांत थोड्या-थोड्या वाढतील.                 – कमल नंदी, अध्यक्ष, कंझ्यु. इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

उत्पादन खर्च वाढला
वाढत्या गुंतवणुकीमुळे एसी,फ्रिजच्या किमती जुलैमध्ये ४-५% वाढल्या.कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे व्हाइट गुड्सचा उत्पादन खर्चही वाढला.                                   – मनीष शर्मा, अध्यक्ष आणि सीईओ, पॅनासोनिक इंडिया आणि द. आशिया


Share this Newz