The Newz Biz Team, PIMPRI
गेल्या ५ वर्षात सांगवीत राहणाऱ्या सत्ताधाऱ्यांची नवीन प्रकल्प दाखवता दाखवता दमछाक होत आहे. जाहीरनाम्यात जे प्रकल्प कबूल केले, त्यांचे भूमिपूजनही करता आली नाहीत. सांगवीमध्ये विकास प्रकल्प तर झाले नाहीत; कमीत कमी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी फूटपाथ आणि चकाचक परिसर दिसेल अशी कामे करा. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सांगवी परिसरात जाहिरात करता येईल, असे मिश्किल आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे, की महापालिकेच्या निवडणुका सहा सात महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सांगवी भागात नेते भरपूर झाले कामे मात्र कमी झाली आहेत. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या व आश्वासनांची जी खैरात वाटली त्याची सुद्धा चिंता न करणारे सत्ताधारी काहीतरी प्रमाणात कामाला लागतील व प्रशासनाला सुद्धा कामाला लावतील, अशी अपेक्षा आहे.
नवीन प्रकल्प नाही, तर जुन्या रस्त्याच्या कडेचे कमीत कमी फूटपाथचे ब्लॉक तरी नवीन टाकून द्या. जेणेकरून रस्त्यावरून चालताना सत्ताधाऱ्यांना काहीतरी केले, हे सांगता येईल. आजचे सत्ताधारी आहेत ते पुर्वीच्या पक्षात असताना काय काय कामे झाली, याची जंत्री याच सत्ताधाऱ्यांनासुद्धा पाठ आहे, पण नवीन पक्षात जाऊन व प्रमुख पदांवर बसूनही आमच्या सांगवीकरांना रस्त्याच्या कॉंक्रीट शिवाय नवीन प्रकल्प पाहायला मिळणार नाहीत, हे आमचे दुःख आहे.
अनेक प्रकल्पांसाठी जागा मिळूनही व आम्हीसुद्धा सहकार्य करण्यास तयार असताना देखील प्रमुख पदाधिकाऱ्यांना कामे करता येत नाहीत, हे सत्ताधारी भाजपाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
सांगवीतील मुख्य रस्ता, पवारनगर प्रभात कॉलनी रस्ता नूतनीकरण व इतर सर्व फूटपाथ नूतनीकरण, रंगकामे तरी व्हावीत, ही अपेक्षा आहे.
प्रशासन म्हणून सांगवी परिसरामध्ये किमान फूटपाथ दुरुस्ती, रंगरंगोटी आणि वरवर चकाचक दिसणारी कामे तरी किमान चांगली करावीत व जाहिरात करण्यात प्रथम क्रमांक असलेल्या पक्षाच्या सत्ताधाऱ्यांना सांगवी परिसरात जाहिरात करता येईल, अशी कामे नागरिकांसाठी व्हावीत हीच अपेक्षा आहे.
-प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पिंपरी चिंचवड







Leave a Review