लहान मुलांसाठीच्या इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, याचे नियोजन व्हावे

प्रशांत शितोळे यांची महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे विनंती
Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभावना असून, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन वैद्यकीय व्यवस्था व्यवस्थित राहील, यासाठी प्रयत्नशील आहे. रुग्णालय, बेडसह लहान मुलांसाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, याचे नियोजन होणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांना प्रसन्न वाटेल अशा रुग्णालयातील व्यवस्थेसह संभाव्य लहान मुले व बाळांसह त्यांच्या आईलाही या ठिकाणी राहता येईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिविर व इतर इंजेक्शनचा संपूर्ण देशातील तुटवडा, काळाबाजार झाल्याने औषधाअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही व उपलब्धता रास्त दरात होऊ शकेल, अशी व्यवस्था करावी, यासाठी तातडीने अशा प्रकारचे इंजेक्शन किंवा उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांबरोबर चर्चा करून शहरासाठी याचे नियोजन करावे.

तसेच एक कर्तव्य म्हणून आपण द्याल ती जबाबदारी पार पाडू, असे आश्वासन प्रशांत शितोळे यांनी या पत्राद्वारे दिले आहे.

 


Share this Newz