विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तळेगाव पोलिसांनी केली अँटीजन टेस्ट ; ३९जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

Share this Newz

The Newz Biz Team, TALEGAON

मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. याचे गांभीर्य नागरिकांना राहिलेले नाही. वीकेंड लॉकडाऊन असूनही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. तळेगाव पोलिसांकडून शनिवारी (दि.२२) विनाकारण फिरणाऱ्या ३९ नागरिकांची तळेगाव स्टेशन चौक येथील चेकपोस्ट नाक्यावर आँन द स्पाॅट अँटीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही एक समाधानाची बाब आहे.

शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक समोर येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

तळेगाव नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून नियम व निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या लाॅकडाऊनची नागरिकांना तमा नाही.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध व नियमांच्या अंमलबजावणीची सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर तळेगाव स्टेशन चौक येथील चेकपोस्टवर कारवाई करण्यात आली.

तळेगाव शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. असे असतानाही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे बेशिस्त नागरिकांना चाप बसण्यास मदत होत आहे. बेशिस्त नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी नियम व निर्बंध अधिक कडक करावेत, अशी सजग नागरिकांची मागणी आहे.

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर नागरिकांनी शासकीय नियमांचे काटकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी काही निर्बंध घालून देण्यात आले असून, नियमांची अंमलबजाणी करण्यात येत आहे. त्याचे नागरिकांनी पालन करून खबरदारी घ्यावी, सुरक्षेच्या साधनांचा वापर करावा, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. अत्यावश्यक सेवेतील कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोना महामारीला थोपविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्या बाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

– भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे


Share this Newz