The Newz Biz Team, PIMPRI
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नवी सांगवीतील संस्कृती लॉन्स येथे काही प्रमाणात नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तयार असून, याकरिता आवश्यक ती वैद्यकीय सेवा महापालिकेने द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघिरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते.
प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की शहरात अनेक ठिकाणी ऑक्सीजन बेड, सेमी व्हेंटिलेटर, व्हेंटिलेटर अशा विविध प्रकारच्या बेडची आवश्यकता असूनही नागरिकांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाच्या धोक्याचे प्रमाण सुद्धा वाढले असून, मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव हा परिसर जवळपास तीन लाख लोकसंख्येचा असून, या परिसरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या सुद्धा काही हजारांमध्ये झाली आहे. या परिसरात त्या प्रमाणात या कोविडवरील वैद्यकीय उपचारासाठी महापालिकेची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सर्व मोठी रुग्णालये यामध्ये जम्बो कोविड सेन्टर, वाय सी एम एच , ऑटो क्लस्टर येथे असणाऱ्या सुविधाप्रमाणे एकही मोठी सुविधा असणारे रुग्णालय सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, वाकड या परिसरात उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे नवी सांगवी भागात आमच्या परिवाराच्या मालकीचे संस्कृती लॉन्स नावाचे मंगलकार्यालय असून, या ठिकाणी काही प्रमाणात नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तयार असून, याकरिता आवश्यक ती वैद्यकीय सेवा महापालिकेने द्यावी, असेही प्रशांत शितोळे यांनी सांगितले.







Leave a Review