आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळे गुरवमध्ये ५० बेडचे कोविड केअर सेंटर

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळे गुरव येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे कोविड सेंटर गुरूवारपासून (दि. २२) कार्यान्वित झाले आहे. आयुश्री हॉस्पिटल कोविड केअर सेंटर, पिंपळेगुरव  ७३/८, साई दर्शन ‘ए’ बिल्डिंग येथे हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने हे कोविड सेंटर कमी पडू लागली आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप व त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या माध्यमातून पिंपळे गुरवमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटलच्या सहकार्याने हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, पिंपळे सौदागर या भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी या कोविड केअर सेंटरचा मोठा आधार मिळू शकेल.

डॉ. कांचन सराफ, डॉ. दिनेश फस्के, डॉ. जितेंद्र पटेल यांची टीम या कोरोना सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची सेवा करणार आहेत. हे सेंटर गुरूवारपासून (दि. २२) कार्यान्वित झाले आहे. माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांनी या सेंटरची गुरूवारी पाहणी केली.


Share this Newz