आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतली कोरोनाची लस; पिंपरी-चिंचवडकरांनाही लस घेण्याचे केले आवाहन

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी (दि. १४) सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात जाऊन कोविड (कोरोना) प्रतिबंधक लस टोचून घेतली. लस घेण्यास पात्र पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांनी लस टोचून घेण्याचे आवाहन आमदार जगताप यांनी यावेळी केले.

कोरोना विरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी डॉक्टर, वैज्ञानिक आणि इतर कोरोना योद्ध्यांनी चांगले कार्य केले आहे. या सर्वांचे कार्य उल्लेखनीय आहे. आता आपण सर्वांनी एकत्रितपणे मिळून आपला देश कोरोना मुक्त करूया, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज कोरोनाला प्रतिबंध करणारा लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी भारत बायोटेकची को-व्हॅक्सिन लस घेतली. औंध जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेने आमदार जगताप यांना कोरोनाची लस दिली.

दरम्यान, देशभरात कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना, दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना आणि आता तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. कोरोनामुक्त भारत करण्यासाठी या लसीकरण मोहिमेत पात्र ठरणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन आमदार जगताप यांनी यावेळी केले.


Share this Newz