The Newz Biz Team, PUNE
हडपसर येथील भेकराईनगरमध्ये डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून, परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. हा केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट नसून, तो पावसाळ्यापर्यंत चांगला पाऊस पडेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
डॉ. सोनवणे हे पेशाने प्राध्यापक आहेत. त्यांना पक्षी, प्राणी यांच्याविषयी तळमळ आहे. उन्हाळ्यात विविध प्रकारचे पक्षी पाण्याच्या शोधात असतात. पाण्याअभावी अनेक पक्ष्यांना प्राणही गमवावे लागत आहेत. त्यामुळे भेकराईनगरमधील पुरंदर कॉलनी श्रेयस विहार सोसायटीने पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. शहरात निसर्ग व पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दलची चांगलीच जनजागृती झाली आहे. त्याची प्रचिती सध्या दिसून येत आहे. सध्याच्या कडक उन्हाळयाचा विचार करून शहरात नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवलेली दिसून येत आहेत. कोणी मातीच्या भांड्यात, तर कोणी प्लास्टिकच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केल्याचे पहावयास मिळत आहे. माध्यमांमुळे पर्यावरणा बद्दलच्या जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या आहेत. वाढत्या उन्हाचा विचार करून पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचा विचार हा त्याचाच एक परिणाम आहे.
भेकराईनगर परिसरातील श्रेयस विहार सोसायटीचे चेअरमन प्रा.डॉ. बाळासाहेब सोनवणे, खजिनदार करण खरात, सचिव गणेश शिंदे, सदस्य गणेश लव्हे, अशोक पांचाळ, रघु बेल्लमकोंडा, तसेच सर्व सभासद व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य यांनी सोसायटी परिसरातील झाडांवर पक्ष्यांना पिण्यासाठी चक्क फिल्टरचे पाणी ठेवले आहे. श्रेयस विहार सोसायटीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा वावर वाढला आहे. पाणपोईवर आता चिमणी, कावळे, कबूतर, साळुंखी आदी पक्ष्यांची गर्दी वाढू लागली आहे. सोसायटी परिसरात एकंदरीत चित्र चांगले दिसत आहे.
परिसरातील सर्व सोसायट्यांच्या लोकांमध्ये याबाबत जनजागृती करणार आहे. सर्व ठिकाणच्या नागरिकांनी आपापल्या भागामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची शक्य तितकी व्यवस्था करावी.
– प्रा.डॉ.बाळासाहेब सोनवणे.









Leave a Review