इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात महिंद्रा गुंतवणार तीन हजार कोटी

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड पुढील तीन वर्षांत आपल्या विद्युत वाहन व्यवसायात ३ हजार कोटी रुपयांच्या नव्या गुंतवणूकीची भर घालणार आहे, तसेच या क्षेत्रातील नव्या सहयोगींचा व भागीदारांचाही ती शोध घेत आहे.

डेट्रॉईट आणि इटलीसह जगभरातील आपल्या कारभाराची क्षमता एकत्र करून ‘ईव्ही प्लॅटफॉर्म’ विकसीत करण्याचे काम महिंद्रा करीत आहे. महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शहा यांच्या म्हणण्यानुसार, विद्युत वाहनांसाठी आम्ही यापूर्वी जितकी गुंतवणूक करावयाचे ठरविले होते, त्याच्या व्यतिरिक्त ही ३ हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे.

येत्या पाच वर्षांत वाहन आणि कृषी क्षेत्रात ९,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल, असे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने यापूर्वी जाहीर केले होते. २०२५ पर्यंत भारतीय रस्त्यांवर ५ लाख विद्युत वाहने उतरविण्याचे उद्दिष्ट ठरविलेल्या या कंपनीने, यापूर्वीच भारतातील विद्युत वाहनांच्या व्यवसायात १,७०० कोटींची आणि नव्या संशोधन व विकास केंद्रात ५०० कोटींची गुंतवणूक केलेली आहे. बंगळुरूमध्ये तिने विद्युत तंत्रज्ञानाचा प्रकल्प सुरू केला आहे. या ठिकाणी बॅटरी पॅक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर्स तयार करण्यात येतात. चाकण येथील नवीन कारखान्यात विद्युत वाहनांचे उत्पादन करण्यासाठीही या कंपनीने गुंतवणूक केली आहे.

महिंद्रा समूहाच्या सर्व व्यवसायांची संपूर्ण देखरेख व जबाबदारी यांची धुरा नुकतीच हाती घेतलेले आणि व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचा भार स्वीकारलेले अनीश शहा पुढे म्हणाले, नव्याने करण्यात येणारी गुंतवणूक ही अगोदरपेक्षा जास्त आहे. आमच्या समुहाच्या विविध क्षमता एकत्र करून, अनेक मॉडेल्स निर्माण करू शकेल असा एक नवीन प्लॅटफॉर्म विकसीत करण्यासारख्या विविध उपक्रमांमध्ये या गुंतवणुकीचा उपयोग केला जाईल.

अनीश शहा म्हणाले की, भारतात इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी या सर्व सुविधा एकत्र आणण्यात येत आहेत. शहा पुढे म्हणाले, “विद्युत वाहनांसाठी आम्ही भागीदार शोधत आहोत. ईव्ही (विद्युत वाहने) हेच भवितव्य आहे. आमची आधीच एका कंपनीशी युती झालेली आहे. लहान ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी ‘आरईई (ऑटोमोटिव्ह)’ या इस्रायलच्या कंपनीशी आम्ही सामंजस्य करार केला आहे. विद्युत वाहनांसाठी इतर काही कंपन्यांशी आम्ही युती करणार आहोत. आम्ही भागीदारीसाठी खुले आहोत, अर्थातच भविष्यासाठी !

भविष्यातील भागीदारी या एखाद्या तंत्रज्ञानावर आधारीत असतील की इक्विटीवर”, या प्रश्नावर अनीश शहा म्हणाले, ” या टप्प्यावर आम्ही सर्व प्रकारच्या शक्यतांसाठी तयार आहोत. अर्थात याबद्दल या क्षणी फार बोलता येणार नाही; कारण आम्हाला अनेक ठिकाणी चर्चा कराव्या लागणार आहेत. ही बोलणी झाली, की त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

भारतातील विदयुत वाहनांच्या बाजारपेठेविषयी सकारात्मक असलेले शहा म्हणाले, प्रवासी व मालवाहतूक या दोन्ही विभागांतील तीनचाकी व लहान चारचाकी वाहनांच्या बाबतीत विचार केल्यास, विद्युत वाहनांची किंमत पारंपरिक वाहनांइतकीच झालेली आहे. बॅटरींची अदलाबदल करण्याची सोय असल्याने चार्जिंगची समस्या उरलेली नाही. म्हणून या विभागात आम्ही लवकरच उत्पादनास सुरुवात करणार आहोत. येत्या २-३ वर्षांत हा आमच्या समुहातील एक महत्त्वाचा भाग होऊ शकतो.

शहा पुढे म्हणाले, चारचाकी विद्युत वाहनांसाठी मात्र बराच कालावधी लागणार आहे. विद्युत व पारंपरिक या दोन्ही गाड्यांच्या मालकीची किंमत समान होईपर्यंत विद्युत मोटारींच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा येणार नाहीत. अनेक गोष्टी एकत्र आणून काम करायचे आहे; तथापि ते घडून येण्यास तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागेल, असा आमचा अंदाज आहे.


Share this Newz