प्रभाग क्र. २८ मधील पाणीप्रश्न त्वरित सोडवा, अन्यथा रास्तारोको करू

नाना काटे व शीतल काटे यांचा पाणीपुरवठा विभागाला इशारा
Share this Newz

The Newz Biz Team, Pimpri

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट प्रभाग म्हणून पाहिले जात असलेल्या पिंपळे सौदागर-रहाटणी या प्रभाग क्र. 28 मधील सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणे, ही नित्याची समस्या बनली आहे. मात्र, थातुरमातुर कारणे देऊन पाणीपुरवठा विभाग वेळ निभावून नेत असल्याची वस्तुस्थिती आहे. प्रभाग क्र. २८ मधील पाणीप्रश्न त्वरित न सोडविल्यास सोसायटीधारकांना घेऊन रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांचा पाणीपुरवठा विभागाला दिला आहे.

याबाबत विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील अनेक सोसायट्यां (कुणाल आयकॉन, जिंजर, ओरोवेट, ब्लु वुड्स, रोझवुड, समृद्धी पार्क, रोझ व्हॅली, द्वारका लॉर्ड, रॉयल ईम्पेरीयो, मन मंदिर, द क्रिस्ट, पुर्वा रेसीडेन्सी, फ्लोरा रेसीडेन्सी) मध्ये कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आपण स्वतः आणि शीतल काटे नागरिकांची पाणी समस्या सोडविण्यासाठी व त्यांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहोत.

मात्र, महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही दरवेळी फिडर प्रोब्लेम, पाईपलाईन फुटली, लाईट गेली अशी उत्तर देऊन पाणी समस्येकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महापालिका आयुक्तांनी प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर-रहाटणीमधील नागरिकांची दैनंदिन गरज असलेली, तसेच प्रभागात कायमची समस्या असलेली पाणी समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी; अन्यथा सोसायटीमधील नागरिकांना घेवून रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असेही नाना काटे यांनी पत्रकात म्हटले आहे.


Share this Newz