बंधन बॅंक पुरविणार भारतीय लष्कराला बँकिंग सेवा

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

भारतातील सर्वात नवीन बॅंक असलेल्या बंधन बॅंकेने आज भारतीय लष्कराशी सामंजस्य करार केला आणि शूरवीर जवानांना बॅंकिंगमधील विशेष सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने बंधन बॅंक शौर्य वेतन खाते ही सुविधा सादर केली.

लेफ्टनंट जनरल हर्षा गुप्ता (एव्हीएसएम, वायएसएम, व्हीएसएम) यांच्या उपस्थितीत, या करारावर लष्कराच्या वतीने लेफ्ट. जनरल रविन खोसला (एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम), डीजी (एमपी व पीएस) यांनी, तसेच बंधन बॅंकेच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

बँकेच्या आऊटलेट नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या जवानांना बंधन बँक शौर्य वेतन खातेंतर्गत सेवा देण्यात येणार आहे. शून्य शिल्लक रक्कम, एक लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर 6 टक्के व्याज, एटीएममध्ये अमर्यादीत प्रमाणात व्यवहार, शौर्य व्हिसा डेबिट कार्डावर सुरुवातीचे व वार्षिक शुल्क माफ आणि एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, डीडी आदी व्यवहार विनामूल्य, अशी अनेक वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत.

बंधन बँक शौर्य वेतन खात्यामुळे जवानांना स्वत:चे व आपल्या मालमत्तांचे संरक्षणदेखील मिळते. यामध्ये, खातेधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास ३० लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमाहवाई दुर्घटना झाल्यास एक कोटी रूपयांचा विमा, तसेच खातेधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलाला चार वर्षे कालावधीसाठी दरवर्षी एक लाख रुपये इतका शैक्षणिक भत्ता अशा सुविधाही मिळणार आहेत. 

यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल रविन खोसला म्हणाले, बंधन बँकेचे स्वागत करताना आम्हाला आनंद आहे. तिचे देशभरातील नेटवर्क, विविध प्रकारची बँकिंग उत्पादने व सेवा यांमुळे आमच्या कर्मचार्‍यांना बॅंकिंगचे व्यवहार विनासायास करता येतील. 

बंधन बॅंक चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर घोष म्हणाले, भारतीय लष्कराच्या शूर जवानांना सेवा देण्याची संधी मिळणे ही बंधन बँकेसाठी भाग्याची गोष्ट आहे. बँक नवीन असतानाही लष्कराने बॅंकिंग सुविधांसाठी आम्हाला निवडले, हा आमचा मोठा सन्मान आहे. देशाची सेवा करण्यात अग्रभागी असणाऱ्यांना बॅंकिंग सेवा पुरविण्यासाठी आमच्या बॅंकेचे कर्मचारीही उत्सुक आहेत.


Share this Newz