डॉ. संभाजी मलघे लिखित ‘आचार्य दर्शन’ ग्रंथास ‘साहित्य पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कारांची घोषणा
Share this Newz

The Newz Biz Team, PUNE 

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ लेखक व इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांच्या आचार्य दर्शन या ग्रंथास डॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांना जीवनगौरव पुरस्कार, प्रा. जे. पी. देसाई यांच्या ‘माझी भाषणे प्रसंग आणि आठवणी’ ग्रंथास साहित्य पुरस्कार, तर पद्मश्री श्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांना सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर व अध्यक्ष उद्धव कानडे यांनी दिली.

या पुरस्कारांचे वितरण येत्या 10 जानेवारी रोजी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेतर्फे पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या नावाने साहित्य, समीक्षा आणि कविता या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंतास डॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

प्राचार्य डॉ. मलघे यांनी ‘आचार्य दर्शन’ या ग्रंथामध्ये आचार्यांविषयी मांडलेले विचार मोलाचे आणि महत्त्वाचे आहेत. डॉ. फडकुले यांनी जीवनभर आदर्श अध्यापक या नात्याने सोलापूर महाविद्यालयात नवी पिढी संस्कारक्षम केली. तो धागा लक्षात घेता ‘आचार्य दर्शन’मध्ये आपण मांडलेले विचार नव्या पिढीवर मूल्य संस्कार करणारे आहेत, असे पत्र महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर व अध्यक्ष उद्धव कानडे यांनी डॉ. मलघे यांना दिले आहे.


Share this Newz