The Newz Biz Team, Pune
कोविड १९ सारख्या संकटाच्या काळात औद्योगिक जगतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे मत राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
पुणे येथे नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या वतीने आयोजित ‘कोविड १९ चा मनुष्यबळ विकास आणि व्यवसाय शाश्वतेवर झालेला परिणाम’ या विषयावरील संशोधन ग्रंथाचे प्रकाशन करताना बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्राचा उच्चार ह्युमन रिसोर्स ऐवजी ह्युमन रिलेशन असा करणे गरजेचे आहे, असे सांगत कोणत्याही आपत्ती काळात समाजजीवनात जे बदल होतात, त्या बदलांकडे आणि समस्येवरील उपाययोजना करताना जे प्रयत्न केले जातात, त्याच्याकडे ज्ञानविषय म्हणून गांभीर्याने बघण्याची गरज आहे. एनआयपीएम’च्यावतीने प्रकाशित करण्यात आलेला हा संशोधनग्रंथ उद्योग जगतासाठी मार्गदर्शक ठरेल, असा आहे, असेही सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.
एनआयपीएमने यापुढेही उद्योग जगातील कार्यसंस्कृती, माहिती तंत्रज्ञानामुळे कार्यशैलीमध्ये झालेले बदल व कर्मचाऱ्यांची ते काम करत असलेल्या आस्थापनेविषयीची आस्था कशी वाढविता येईल, यासारख्या विषयावरसुद्धा संशोधन करावे, असे आवाहन यावेळी डॉ. सहस्रबुद्धे यांनी केले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाद्वारे सुरु असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी मनुष्यबळ व्यवस्थापकांना सुद्धा डॉक्टर, वकील व सीए यांच्याप्रमाणे चार्टड स्टेट्सचा दर्जा देण्याविषयी केंद्र सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्याविषयीची भूमिका विशद केली.
कार्यक्रमाला भारत फोर्ज लि. कंपनीच्या एच. आर व आय. आर. विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्यासह कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध नामांकित कंपन्यांचे पन्नास मनुष्यबळ व्यवस्थापक उपस्थित होते. तर फेसबुक लाईव्हद्वारे सुमारे एक हजार मनुष्यबळ व्यवस्थापकांची ऑनलाईन उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एक्च्युएशन टेक्नॉलॉजीज इमर्सन कंपनीच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका हेमांगी धोकटे यांनी, तर आभार प्रदर्शन एनआयपीएमचे सचिव नरेंद्र पाटील यांनी केले.







Leave a Review