नवी दिल्ली : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने देशात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्रही थांबले होते. सध्या परिस्थिती सुधारली नसली, तरी देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्थव्यवस्थेलाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
कोरोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यास रिझर्व्ह बँक तयार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी खासगी क्षेत्रांनीही योगदान देण्यासाठी पुढे यावे, असेही ते म्हणाले.
उद्योग संघटना फिक्की तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जीडीपीच्या आकडेवारीवरून करोनाचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला आहे याचे संकेत मिळत असल्याचे दास म्हणाले.
कोरोनानंतर आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांना रिसर्च आणि इनोव्हेशन, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याची आवश्यकता आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक व्यापक संधी उपलब्ध आहेत आणि खासगी क्षेत्रांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
देशातील नव्या शैक्षणिक धोरणाविषयी बोलताना ते म्हणाले, की शिक्षण कायमच आर्थिक विकासात आपले योगदान देते. त्यामुळे नवे शैक्षणिक धोरण हे ऐतिहासिक आहे आणि नव्या सुधारणांसाठी ते आवश्यकही असल्याचे दास म्हणाले. पर्यटन क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचे इंजिन ठरू शकते. येत्या काळात याच्या मागणीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे. अशातच या क्षेत्राला कॅपिटलाईझ करण्याची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त लोन रिस्टक्चरिंग स्किम तयार करताना लोकांच्या हितांचे आणि त्यांच्या आर्थिक स्थिरतेचा विचार होणे महत्त्वाचे आहे. सुरू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कृषी, उत्पादन या क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि पुढील काळात ती वेगानेही वाढेल. याव्यकतिरिक्त बेरोजगारीही हळूहळू कमी होण्याची शक्यता असून काही क्षेत्रात त्यात घट झाल्याचे दास यांनी सांगितले.







Leave a Review