“परसबाग” (परड)

परड अर्थातच हा एक गावाकडचा ग्रामीण शब्द आहे व परसबाग हा शुद्ध… सुशिक्षित माणसांचा शब्द. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते.
अंगण वेगळं, व परड वेगळं ! घराच्या समोर असते ते अंगण व घराच्या पाठीमागील बाजूस परड म्हणतात. आपल्याकडे जुन्याकाळी परडी खूप मोठी असायचीत. त्यावेळी ती फक्त परडी नसून, ती एक हक्काची “सुपर मार्केट” होतीत. हे आता मला विचार करताना जाणवतंय.
अर्थातच आम्ही सुट्टीला गावी आलो की, ह्या “परड” नावाच्या अद्भुत दुनियेची मला ओळख व्हायची. अहो!!! काय नसायचं ह्या परडयात……???
ज्यावेळी घरात काही नसेल तेव्हा तुम्हाला इथे पेरू हमखास खायला मिळणार. कुपणांवरच्या काकड्या, चवळीच्या कोवळ्या शेंगा, बेलवांगी, कच्च्या टोमॅटोचा हा प्रकार खुप आंबट पण छान लागायचा खायला. काकडीला “वाळूक” म्हणायचो आम्ही.
खेळून, भांडाभांडी करून पोटं भरली की “परडयात दुपारच्या वेळी घरातील मंडळींचा डोळा चुकवून परडयात जाणे हा एक खूप मजेशीर प्रकार असायचा.
आम्ही मे महिन्यात आलो कि,” परडी पेरणे “हा एक मस्त कार्यक्रम असायचा.
मला लेखनानंतर कोणतं असं काम तुला आवडतं असं जर कोणी मला विचारलं तर मी अगदी आवडीने सांगेन, “बागकाम” म्हणजेच माझं एक हक्काचं असं परडं. जिथे एका बाजूला फळ – फुलं, सगळं काही पिकवता येईल.
तर, हे परडं पेरण्यात घरातील सगळ्या व्यक्तींचा सहभाग असे..!!!
प्रत्येकाच्या परडयात आवर्जून, “एक नारळाचं झाड, एक शेवग्याचं, एक कडिलिंब, पेरू, कदाचित चिकू ही, अनोळख्या सारखं एकटचं उभा राहिलेलं!!? मरतुगंडयासारखं डाळिंब ही कोपर्यात उभं असायचं…. क्वचित..!!
न्हाणी घराच्या कोपर्याला, सांडपाण्याचा डबरा असायचा…! तो डबरा ही वर्षातून एकदा उपसणे हा एक मोठा सोहळा असायचा असं म्हणायला काही हरकत नाही. हक्काचं नारळाचं झाड मानाच्या स्थानी असायचं जे आजही टिकून आहे.
शेवगा, पेरू आजही दिसतो.
तर, हे परडं नांगरलं की, एक सरी, बावचीची म्हणजेच गवारीची,! दोन दोन बिया अलवार टाकतं जायच्या.
एक सर भेंडीची, एक वांग्याची, चवळी. कडेने म्हणजे चारी बाजूने, दिडका, ज्याला आपण बिन्स म्हणतो, वरणा म्हणजे पावटा, जगदाळा.

परडयात सुरवातीलाच असणाऱ्या तुळशीजवळ दोडक्याचा मांडव. परडयातल्या अगदी लांब शेवटी कोपर्यात असणाऱ्या खोपीजवळ आळं करून भोपळ्याच्या वेलाची सोय व्हायची. अजूनही मला एसटी तून खोपींवर मांडी घालून बसलेले ते रूबाबशीर भोपळे दुरूनही स्पष्ट दिसतात. आणि नकळतचं माझ्या चेहर्यावर एक छोटसं हास्य चमकतं.
संडास अगदी लांबवर. त्याला छोटीसी पायवाट ही वेगळी असायची. त्याच्या कडेने जास्वंद, मोगरा, आबोली, कोरंटी, मेहंदीची झुडपं.
भावकीच्या हद्दीला हमखास आडुळस्याचं कुंपण असायचं. आता निर्जीव दगडांची कुपंणं झाली ते वेगळचं हो….!!! कारण माणसंही निर्जीव झालीत ना!!!
पहिली माणसं सजीव त्यांची कुपणं ही सजीव..?
असो!!! मग काय गणपतीला आम्ही गावी आलो की, परडं नुसतं भाज्यांनी फुललेलं असायचं. रंगबिरंगी फुलपाखरं वेड्यागत त्या परडयात झिम्मा फुगडी घालायचीत.
मी भोपळ्याच्या फुलांना तासनतास पहात रहायची, तेव्हा आज्जी म्हणायची,….. अगं काय एवढं बघतील? मी म्हणायचे….. ह्या एवढ्याश्या फुलातनं भोपळा कसा येत असेल गं?
तेव्हा आज्जी म्हणायची, “देवाची करणी आणि नारळात पाणी, नको गं माझी राणी विचार करूस तू,???”
आनंदाने दोडके तोडणे, बावच्यांचे घस तोडणे., कोवळ्या कोवळ्या भेंड्या तोडणे, पोच्या शेंगा तोडायच्या नाहीत भरलेल्या तोडायच्या. संडासाच्या ही लांब पाठीमागे असणाऱ्या कर्दळीच्या झुडपातून रोज कर्दळीची फुलं आणणे. मेहंदी सुकवून….. वस्त्र गाळ करून माचीसच्या काडीनं मेहंदी काढणे. आबोली, मोगरा, कोरंटीचा मिक्स गजरा करणे.
असं अगणित आठवणींचा खजिना परडयात पुरून ठेवला आहे.
पण सगळ्यात जास्त आठवतं ते परडयातल्या भाज्यांचा तो अप्रतिम असा वास व ती तुप्पट अशी अप्रतिम चव. हो हळद ही परडयात पिकवली जायची. सांगायचे विसरले हो..!!
असं हे परडं जे अजूनही गावाकडे केलं जातं. “भाज्या आणायला बायका बाजारला निघाल्या कि, मी असं बोलताना ऐकलं आहे,” यंदा आम्ही परडं नाही केलं हो, म्हणून जावं लागतंय बाजारला “.!!
कडिपत्यापासून हळदी पर्यंत सर्व काही हक्काने व ताजं मिळणारा माल म्हणजे” परड”कोण विसरेल हो???
(©® स्वलिखित लेख)
सुजाता पाटील, मुंबई 🖋








Leave a Review