प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात एक लाख वारकरी करणार आंदोलन

Share this Newz

पंढरपूर : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत. वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणारे आंबेडकरांकडे याचे नेतृत्व आल्याने आंदोलनाचे महत्त्व वाढले आहे.

            वारकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या लढ्याला अधिकच धार आली आहे. याबाबत आता सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे. प्रशासनासोबत शुक्रवारी झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे २ लाख वारकरी येतील, अशा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी या प्रश्नावर जिल्हाधिकारी विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

            सध्या पंढरपूरमध्ये दोन हजाराहून अधिक कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास घाबरत आहे. असे असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाल्याने २४ ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मात्र संघर्ष अटळ बनणार आहे. या विषयावर वाद पेटला असताना सर्वसामान्य वारकरी मात्र या वादापासून अलिप्तच आहेत.


Share this Newz