पिंपरी : प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू आणि युवकांना आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गेल्या आठ महिन्यात महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. याबाबत नगरसेवक शामभाऊ जगताप यांनी महापालिका सभागृहात प्रश्न उपस्थित करीत क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. महापौर व महापालिका आयुक्त यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन क्रीडा समितीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही नगरसेवक जगताप यांनी केली.
महापालिका क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निधीबाबत होत असलेल्या दिरंगाईचा मुद्दा नगरसेवक शामभाऊ जगताप यांनी महापालिका सभागृहात उपस्थित केला. क्रीडा समितीच्या माध्यमातून शहरात विकासकामे करण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून निधीच उपलब्ध झालेला नसल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
क्रीडा विकासासाठी समिती स्थापन होते, मग निधी कुठे अडकतो? असा सवाल उपस्थित करत नगरसेवक जगताप यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात ओपन जिम, बंदिस्त व्यायामशाळा आणि तालमींच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे होणे अपेक्षित असताना निधीअभावी एकही विकासकाम होऊ शकलेले नाही, ही बाब त्यांनी स्पष्टपणे मांडली.
शहरातील तरुणांना व्यायामासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात, स्थानिक खेळाडूंना सरावासाठी योग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी आणि पारंपरिक क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, यासाठी क्रीडा सुविधांचा विस्तार अत्यावश्यक आहे. मात्र, निधीच उपलब्ध होत नसेल तर क्रीडा विकासाची उद्दिष्टे साध्य कशी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन क्रीडा समितीला आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी शामभाऊ जगताप यांनी केली.
खेळाडूंना आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष सुविधांची गरज आहे. निधीअभावी क्रीडा विकासाची कामे रखडणे ही बाब गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. आता प्रशासनाने केवळ आश्वासने न देता निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.










Leave a Review