सांगवी-पिंपळे गुरव परिसरात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री

Share this Newz

सांगवी, प्रतिनिधी :
 सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. शासनाने गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य काही पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही परिसरातील काही पानटपऱ्या, किराणा दुकानांमधून अशा पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
        विशेष म्हणजे, अशा प्रकारची विक्री सुरू असताना सांगवी पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील विविध ठिकाणी लपून छपून गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले असून ज्या ठिकाणी गुटखा मिळतो त्या ठिकाणी या गोष्टीना कोडवर्ड देत व इतर नावाने गुटखा मागितल्यास बंदी असलेले तत्सम वस्तू मिळत असून, यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याने व अगदी सहजतेने गुटखा व इतर पान मसाला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नागरिकांना गुटखा विक्री दिसते, पोलिसांना का नाही ?
परिसरात विविध ठिकाणी गुटखा मिळत असून रात्रीच्या वेळीही अंधाराचा फायदा घेऊन विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसाला जे दिसत आहे ते या ठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलीस, गस्तीवरील मार्शल, कर्मचारी यांना दिसत नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
——————————
ठोस कारवाई नसल्याने विक्रेत्यांचे वाढतेय मनोबल :
       प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे मनोबल वाढत आहे. सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात प्रतिबंधित गुटख्याची विक्री नेमकी कुठून आणि कोणाच्या माध्यमातून केली जात आहे, हे शोधणे गरजेचे आहे. संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून गुटख्याचा पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीपर्यंत पोहोचावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
       नेहमीच्या ग्राहकांना गुटखा पुरवण्याचा व पैसे कमावण्याचा सोपा मार्ग शोधून काढला जात असून, या परिसरात खवा, चॉकलेट, मसाला व इतर सांकेतिक शब्द टोपण नाव वापरून व इशारा करून गुटखा विक्री होत आहे. ठराविक व नेहमीच्या ग्राहकांना गुटखा दिल्याने विक्री करणारे उजेडात येत नाहीत. काही ठिकाणी पोलीस येण्याअगोदर सर्व प्रकारची काळजी घेतली जाते, तर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर दिवसाढवळ्या गुटखा मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
       सकाळी लवकर दुचाकीवरून अगरबत्ती, फुले देण्याच्या बहाण्याने काही गुटखा पुरवठा करणारे सामान्य नागरिकांच्या व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून व इतर मार्ग अवलंबून गुटखा पुरवठा करतात यामागे परराज्यातील काही लोक असून ते छुप्या पध्दतीने गुटखा आणून विकत असल्याचे दिसून येत आहे.
        प्रतिबंधित गुटख्याच्या खुलेआम विक्रीला आळा घालण्यासाठी सांगवी पोलिस प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
————————————
परिसरात छुप्या पद्धतीने व बाहेरील राज्यातून मागवण्यात येणाऱ्या बंदी असणाऱ्या गुटखा सहज मिळत असून पानाचे ठेले व टपऱ्याच नाही तर यात काही किराणा दुकानापासून अनेक सहभागी आहेत. खाणाऱ्यांना यासाठी खास भाषेत मिळण्यासाठी व देण्यासाठी काम होत असून पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. – विजय खाटमोडे, स्थानिक रहिवासी

Share this Newz