पुणे, प्रतिनिधी :
अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर व क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा २०२६’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात सायबर अवेअरनेस अँड इनडोअर मास गॅदरिंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित डिजिटल सवयी रुजविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात सायबर सुरक्षा प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर सायबर वॉरियर्सनी सादर केलेल्या ‘कलियुगातील कृष्ण -एक सायबर वॉरियर’ या प्रभावी नाटिकेने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. महाभारतातील प्रसंगांचा संदर्भ घेत आजच्या डिजिटल युगातील ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, सोशल इंजिनिअरिंग, बनावट कॉल, ओटीपी फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांचे वास्तव प्रभावीपणे उलगडून दाखविण्यात आले. नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचा आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला ब्रह्माकुमारी प्रजापती संस्थेच्या लक्ष्मी दीदी, अँटी नार्कोटिक सेलचे पोलीस निरीक्षक श्री. जीवन माने, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी सायबर वॉरियर्सच्या या जनजागृती उपक्रमाचे विशेष कौतुक करत, “अशा प्रकारचे सायबर जनजागृती अभियान विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत सजग बनवते. समाजात अशा उपक्रमांची संख्या वाढल्यास सायबर गुन्ह्यांमध्ये निश्चितच घट होण्यास मदत होईल,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्विक हील फाउंडेशनच्या अनुपमा काटकर, दीपू सिंग, अजय शिर्के, गायत्री केसकर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. विलास वानी तसेच शिक्षक समन्वयक प्रा. मनीषा गाडेकर, डॉ. सविता कुलकर्णी,डॉ. गणेश गांधील,
डॉ. धीरज देशमुखयांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर्सनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रशांत मुळे यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि सायबर वॉरियर्स यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
सायबर सुरक्षेबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहारांची सवय लावणे आणि सुरक्षित डिजिटल भारताच्या निर्मितीस हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
अण्णासाहेब मगर महाविद्यालय व क्विक हील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृतीसाठी इनडोअर मास गॅदरिंग उत्साहात संपन्न








Leave a Review