पिंपरी, प्रतिनिधी :
पिंपळे गुरव प्रभाग क्र. २९ मधील स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ खांदे बदलीच्या ठिकाणी रॅम्प व पायऱ्यांच्या चुकीच्या रचनेमुळे पावसाळ्यात पाय घसरून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. परिणामी नागरिकांना जीव मुठीत धरून मयत खांद्यावर न्यावी लागत आहे. मनुष्याचा अंतिम विधी तरी सुरक्षित व्हावा, या दृष्टीने महापालिकेने या स्मशानभूमीच्या समस्येकडे गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या संदर्भात अरुण पवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेने पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीचे नूतनीकरण केले. मात्र, यामुळे स्मशानभूमीतील समस्या सुटण्याऐवजी नागरिकांना त्रासच सहन करावा लागत आहे. यामध्ये स्मशानभूमीच्या मुख्य रस्त्याकडील मुख्य प्रवेशद्वाराची रुंदी साधारण २५ फूट आहे. परंतु, अंत्यविधीच्या वेळी अंत्ययात्रा आल्यानंतर वाटेत खांदे बदली करण्यासाठी लोक तिथे थांबतात. इथे योग्य पायऱ्या किंवा टप्पे नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. खांदे बदली करताना नागरिकांना अंत्यविधीची मयत सुरक्षितपणे धरून ठेवणे व थांबणे कठीण जाते. त्यामुळे स्मशानभूमीजवळ अंत्ययात्रा आल्यानंतर खांदे बदली करण्यासाठी जिथे थांबा आहे, त्या बाजूला तात्काळ योग्य व रुंद पायऱ्या (टप्पे) करण्यात याव्यात.
तसेच, सध्या ज्या बाजूला अत्यंत छोट्या व अरुंद पायऱ्या आहेत, त्या बाजूला सुधारणा करून तेथून गाडी किंवा टेम्पो येण्या-जाण्यासाठी जागा व टप्पे तयार करण्यात यावेत, जेणेकरून अंत्यविधीचे साहित्य किंवा इतर वस्तू घेऊन येणारे टेम्पो व वाहने सहजपणे आत येऊ शकतील.
अरुण पवार यांनी पुढे म्हटले आहे, की स्मशानभूमीत अंत्यविधीच्या वेळी साधारण एक ते दीड हजार नागरिकांची उपस्थिती असते. खांदे बदलीच्या ठिकाणी रॅम्प व पायऱ्यांच्या चुकीच्या रचनेमुळे पावसाळ्यात पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मयत खांद्यावर न्यावी लागत आहे.
———————-
पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीतील या गंभीर समस्येबाबत गेल्या १५ दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने या जनहिताच्या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थापत्य विभागाने तात्काळ जागेची पाहणी करावी.– अरुण पवार, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस










Leave a Review