पुणे, प्रतिनिधी :
भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरासह जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड व भोर तालुक्यांसाठी दि. ०७ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट दिला असून, खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार दि. ०७ जुलै रोजी या तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक (जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, खाजगी शाळा, अनुदानित व विना अनुदानित खाजगी शाळा, इंग्लिश मिडीयम शाळा, सर्व अंगणवाडी) शाळांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (सर्व व्यवस्थापन मनपा शाळा, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, इंग्रजी माध्यम व सर्व अंगणवाड्या) यांनाही मंगळवारी सुट्टी देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
भारतीय हवामान खात्याने विलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक ०६ जुलै रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Thunder and lightning in Pune) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला होता. पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये घाट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मंगळवार दि. ०७ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड व भोर तालुक्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, शाळा बंद ठेवणे आवश्यक आहे.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.








Leave a Review