पुणे, प्रतिनिधी :
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात डिजिटल एज्युटेक आयटी सोल्युशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सीओ-पीओ मूल्यांकन आणि अहवाल’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए. एम. जाधव यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत डिजिटल एज्युटेक आयटी सोल्युशनचे संचालक योगेश पवार व समृद्धी गाजरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रस्ताविक केले.
परिणामाधिष्ठित शिक्षण पद्धती (OBE ) म्हणजे विद्यार्थ्यांनी अपेक्षित शिक्षण परिणाम कितपत साध्य केले आहेत, हे मोजून आणि त्यामध्ये सातत्याने सुधारणा करून शिक्षणाची गुणवत्ता वाढविणारी प्रणाली आहे. अभ्यासक्रमात निश्चित केलेली उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात का, याचे मूल्यमापन ही प्रणाली करते. परिणामाधारित शिक्षण हे एक निरंतर शैक्षणिक गुणवत्ता चक्र आहे, जे मूल्यमापन डेटाचे कृतीयोग्य शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेत करते, असे योगेश पवार यांनी सांगितले.
डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून ज्ञानाबरोबर क्षमतांचा विकास व नवीन कल्पना, कौशल्ये आत्मसात करता यावीत, या अनुषंगाने ‘सीओ-पीओ’चे उपयोजन केले पाहिजे, असे सांगितले.
ए. एम. जाधव यांनी सीओ – पीओ हे विद्यार्थी, शिक्षक, अध्यापन आणि अभ्यासक्रम या संबंधी असून, या मूल्यमापनाने शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांचे बौद्धिक स्तर लक्षात घेऊन अध्यापन करता येऊ शकते, असे सांगितले. प्रा. शशिकला वाल्मिकी, डॉ. बजरंग शिंदे, डॉ. उल्हास लंगोटे यांनीही विचार व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ. प्रशांत मुळे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. लतेश निकम, डॉ. विलास मोरे उपस्थित होते. या कार्यशाळेत अण्णासाहेब मगर महाविद्यालय, वाघिरे महाविद्यालय सासवड, इंजिनिअरिंग कॉलेज हडपसर, लॉ कॉलेज हडपसर, फार्मसी कॉलेज आणि एमबीए कॉलेज या महाविद्यालयातील एकूण २७५ शिक्षक सहभागी झाले होते.
सूत्रसंचालन डॉ. विलास मोरे यांनी, तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले. परिचय डॉ. लतेश निकम यांनी करून दिला.










Leave a Review