पुणे फोटोग्राफर्स असोसिएशनचा ‘फोटो फेअर’ उत्साहात संपन्न

Share this Newz

पुणे : पुणे फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘फोटो फेअर’ आणि ‘विशेष गौरव सोहळा’ पुण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रदर्शनातून फोटोग्राफी क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव पुणेकर फोटोग्राफर्सना एकाच छताखाली घेता आला.

प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवर कांजी भाई आणि सोनीचे अभिजीत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या फेअरमध्ये निकॉन, कॅनन, लुमिक्स, फ्युजी, एचपी, डिजिटेक आणि गोडॉक्स यांसारख्या नामांकित ब्रँड्ससह फोटो लॅब व कॅमेरा उपकरणांचे एकूण १८ स्टॉल्स उभारण्यात आले होते. पुण्यातील ६०० हून अधिक फोटोग्राफर्सनी प्रदर्शनाला भेट देत नवीन कॅमेरे, लेन्सेस आणि लाइटिंग तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

‘कॅमेरा डॉक्टरांचा’ विशेष सन्मान

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कॅमेरा रिपेअर तज्ज्ञांचा विशेष सत्कार. “ज्याप्रमाणे डॉक्टर मानवी शरीराची काळजी घेतात, त्याचप्रमाणे फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याला जीवदान देण्याचे काम रिपेअरिंग तज्ज्ञ करतात,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते पुण्यातील सात प्रमुख कॅमेरा रिपेअर तज्ज्ञांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध इंडस्ट्रियल फोटोग्राफर विश्वास सोरटे उपस्थित होते. तसेच, असोसिएशनतर्फे आयोजित फोटोग्राफी स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त आणि या उपक्रमाच्या यशाबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.


Share this Newz