मोशीत १५ मे १७ मे दरम्यान ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’चा जागर

Share this Newz

पिंपरी : मराठा समाजातील उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था’ सज्ज झाली आहे. संस्थेच्या वतीने येत्या १५, १६ आणि १७ मे रोजी मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (PIECC) येथे ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा अधिकृत लोगो आणि टिझर पत्रकार परिषदेत लाँच करण्यात आला.

यावेळी संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संजय वायाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन खामकर, बाळासाहेब गायकवाड, महेश आंबड, गणेश जाधव, गणेश औत्ताडे, विजय भोसले, विक्रम नाणेकर व पधादीकारी उपस्थित होते. दरम्यान, ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रदर्शनात १००० पेक्षा जास्त उद्योजक आपले उत्पादन आणि सेवा जगासमोर मांडणार आहेत. यामुळे स्थानिक उद्योगांना मोठी बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. दररोज ५ नामवंत जागतिक उद्योजक नवउद्योजकांना यशाचे मंत्र देतील. व्यवसाय वाढीसाठी आणि तो जागतिक स्तरावर नेण्यासाठी हे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. या एक्स्पोमध्ये किमान २० टक्के महिला उद्योजक आणि तरुण पदवीधारक नवउद्योजकांना सामावून घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

व्यवसायात भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी अनेक गुंतवणूकदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी १०० पेक्षा जास्त जागतिक सामंजस्य करार (MoUs) केले जातील.

या अधिवेशनासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील विविध मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्योगाशी संबंधित शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शन थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे.

“मराठा समाजात जास्तीत जास्त उद्योजक घडवणे आणि असलेल्या उद्योजकांना त्यांचे व्यवसाय जागतिक स्तरावर नेण्यासाठी सक्षम करणे, हेच या एक्स्पोचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
— संजय वायाळ (आंतरराष्ट्रीय अध्यक्ष)


Share this Newz