अरविंद एज्युकेशन सोसायटीत ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’चा संदेश देत मकरसंक्रांत उत्साहात साजरी 

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत मकर संक्रातीचा सण शैक्षणिक वर्ष 2023- 24 मधील विविध उपक्रमांवर आधारित पतंग, भेटकार्ड बनवणे, सुगडे रंगविणे या स्पर्धानी, तसेच ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’, असा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, शिक्षिकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व धान्य पूजनाने करण्यात आली. यावेळी लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षा आरती राव यांनी संस्कृती टिकवून ठेवण्यात सणांचे असलेले महत्त्व, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा भौगोलिक दृष्टिकोन देखील विद्यार्थ्यांना सांगितला.
मुख्याध्यापिका आशा घोरपडे व नीलम पवार यांनी संक्रातीला केले जाणारे पदार्थ हे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत, याविषयी माहिती दिली. शिक्षिका स्वाती तोडकर, संजीवनी बडे, मंजुषा भाग्यवंत यांनी संक्रांत साजरी करण्यासाठी वापरत असलेल्या धान्याची आकर्षक मांडणी करून त्यांचे वैशिष्ट्य सांगितले. शिक्षिकांनी विविध वेषभूषा करुन वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे असलेले महत्त्व सांगितले. देबजानी मुजुमदार यांनी आसामी, लखवीर कौर, सुनीता ठाकूर यांनी पंजाबी, रविना कांबळे यांनी तमिळनाडू, सुमित्रा कुंभार यांनी कर्नाटक व प्रिती पाटील, सुजाता गोरे यांनी महाराष्ट्रीयन वेषभूषा केली होती. विद्यार्थिनींनी नेपाळी, हिंदी फ्युजन गाण्यांवर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका मोनिका रामस्वामी, सोनाली आवळे, दीपा गायकवाड यांनी केले.


Share this Newz