मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्त्यांनी पावसाळ्यापूर्वी केली ग्रामस्वच्छता

Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पुणे, दि. 21 : काही दिवसातच पावसाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने धारूर (धाराशिव) येथे सलग सातव्यांदा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, सरपंच बालाजी पवार, समाजसेवक रत्नाकर खांडेकर, डॉ. अण्णासाहेब गरड, जगन्नाथ महाराज, प्रदीप कदम, महेश गडदे, विशाल पवार, अभिजीत कामटे, बालाजी गुरव, सोमनाथ कोरे, जयसिंग पाटील, श्रीराम कदम, महेश गुरव, बाळासाहेब कोरे, अमर पाटील, हरी पवार, काका पाटील, लक्ष्मण कोनाले, पांडुरंग लोहार, तसेच गावातील युवक वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
अरुण पवार यांच्या संकल्पनेतून व सरपंच बालाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची भैरवनाथ मंदिर येथे सुरुवात करण्यात आली. मंदिर परिसरातील पुरातन काळातील जुनी बारव (विहीर) स्वच्छ करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार आणि श्रीराम कदम या दोघांनी धाडसाने पन्नास फूट खोल विहिरीमध्ये दोरीच्या साहाय्याने खाली उतरून विहीर स्वच्छ करण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच विहिरीमध्ये पाणी नसतानाही सुद्धा एक कासव जिवंत आढळून आले. त्यास पाणी असलेल्या दुसऱ्या विहिरीमध्ये सोडून जीवनदान देण्यात आले. मंदिर परिसरात यात्रेदरम्यान झालेला एक टन कचरा कार्यकर्त्यांनी गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. त्या दरम्यान झाडावरील तहानलेल्या माकडाला पाणी ठेवण्यात आले.
मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांपासून धारूर ते तुळजापूर बायपासपर्यंतच्या हजारो झाडानां दररोज टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. तसेच वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचे काम केले जात आहे.


Share this Newz