अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जलसंधारण दिनाचे आयोजन

Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पुणे : पाण्याचे संवर्धन आणि जतन संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत आवश्यक असून त्या संदर्भात अभ्यास होणे गरजेचे आहे. हा उद्देश लक्षात घेऊन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मु पो केतकावळे ता पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी पाणी, प्राणी, वनस्पती यांच्या सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या सर्वेक्षणातील घटकांचे विश्लेषण आणि निष्कर्ष संकलित करून त्याचे पुस्तक तयार करण्यात आले. जलसंधारण दिनाचे औचित्य साधून हे पुस्तक तयार करण्यासाठी सहभागी प्राध्यापकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुस्तकाची प्रत देण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ सविता कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन लगड, डॉ अंजू मुंढे, प्रा. गौरव शेलार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सविता कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन आपल्या विषयाचे सर्वेक्षण करून त्यांचा अहवाल तयार केल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये गावामध्ये उपलब्ध असणारे पाणी आणि त्याची गुणवत्ता यांचाही अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थी, प्राध्यापक, समाज या सर्वांना सहभागी करून घेता येते असे सांगून यातून आपल्या तज्ञ प्राध्यापकांचा उपयोग होतो, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळते आणि ग्रामस्थांना तेथील प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून देता येते. त्यामुळे जलसंधारणासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर उपस्थित प्राध्यापकांना प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी पुस्तकाची प्रत प्रदान केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नितीन लगड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. गौरव शेलार यांनी केले.


Share this Newz