मावळातील लेण्या या बुद्धधर्मीय कलाविष्कार आणि काष्ठशिल्पाचा उत्तम नमुना : प्रा. सत्यजीत खांडगे

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : मावळातील लेण्यांवर बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. तसेच बुद्धधर्मीय कलाविष्कार आणि काष्ठशिल्पाचा उत्तम नमुना दिसतो. एवढेच नाही तर या लेण्यांमध्ये अग्निजन्य खडक सापडल्याच्या खुणा आहेत. विहार, पोड्या (पाण्याची टाकी) शिल्पकला व मूर्तिकलाही आढळते. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. डॉ. सत्यजीत खांडगे यांनी केले. 
        तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे आयोजित ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले’त ‘मावळच्या प्राचीन लेण्यांचे वैभव’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष अनिश होले, विन्सेंट सालेर, मिलिंद शेलार, विलास काळोखे, बाळासाहेब शिंदे, सुदाम दाभाडे, राहुल खळदे, संदिप पानसरे, कैलास काळे, शंकर हदिमणी, अनिल धर्माधिकारी, पांडुरंग पोटे, विलास टकले, सुनिल खोल्लम, रजनीगंधा खांडगे आदी उपस्थित होते.
            सत्यजीत खांडगे पुढे बोलताना म्हणाले, की मावळमध्ये जवळपास पन्नासहून अधिक लेण्या आहेत. त्या प्रामुख्याने सातवाहन, राष्ट्रकुट या राजवंशाच्या काळात कोरल्या गेल्याचा इतिहास आहे. धर्मप्रसारासाठी त्यांची सोपी सोय व्हावी, म्हणून लेण्या खोदल्या गेल्याचे दिसते. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये मावळातील कार्ले, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर अशा परिचित लेण्या आहेत. या लेण्यांची काही ठिकाणी झालेली पडझड दुरुस्ती करून मावळातील ऐतिहासिक लेण्यांचा वारसा जपण्याची मोठी आवशक्यता आहे.
           मावळातील ऐतिहासिक लेण्या या इतिहासाने आपल्या पदरात टाकलेले संचित आहे. धार्मिक व पंथीय तत्त्वज्ञानावर आधारित या लेण्यांचा वारसा जपून विकास करणे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी लेण्यांचा अभ्यास करून त्यांचे जतन करावे. तसेच लेण्यांमधील ज्ञात अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकायचा असेल, तर त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. तरच हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू, असेही सत्यजीत खांडगे यांनी सांगितले.
        सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी, तर आभार सुदाम दाभाडे यांनी मानले.

Share this Newz