“ते आले, त्यांनी आश्वासन दिलं आणि ते जिंकले”

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी रात्री अकरानंतर भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्यच असून, आपण त्यांच्या पाठिशी आहोत, येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.     

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक भेट देत शरद पवार थेट विद्यार्थ्यांमध्ये गेले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शरद पवार यांच्या आगमनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच उत्साह संचारला आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असे सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसारच घ्याव्यात या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थी आपल्या मागाण्यांवर ठाम होते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी येऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत होते. अशातच रात्री अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट विद्यार्थ्यांना भेटायला आले आणि दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. आणि उपोषण सोडण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. दरम्यान, पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावत दोन दिवसात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन घेतलं. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेत शरद पवार यांचे धन्यवाद मानले.


Share this Newz