द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवीच्या एस.जे.एच. गुरूनानक हायस्कूलमधील शिक्षक सागर झगडे यांना महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीचा ” महात्मा फुले- सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार ” स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आला.
महाराष्ट्रातील सुमारे 800 हून अधिक शिक्षकांतून ५० निवडक शिक्षकांना हा पुरस्कार दिला गेला .या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असून केवळ चार भिंतीच्या आत शिकवणारा शिक्षक नव्हे तर जो समाजाला शाळा मानून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या विचारांचा वारसा जपत, विचारास कृतीची जोड देत शिक्षणातून नावीण्य पूर्ण असे उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांची यात निवड करण्यात आली. कुठलाही प्रस्ताव न मागवता, राजकीय शिफारस न करता या पुरस्कारार्थीची निवड केली गेली.
सागर झगडे यांचा शिक्षक म्हणून प्रवास हा १२ वर्षाचा आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.फिल पदवी ही घेतली आहे. आपल्या नावीन्यपूर्ण अध्यापनामुळे ते शाळेतही विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर गिर्यारोहण छंद जपत आत्तापर्यंत ४० हून अधिक गड किल्ले सर केले आहेत. इतरांना गड किल्यांचे महत्व समजावे व त्यासाठी स्वतः कृतीची जोड द्यावी म्हणून आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस गडावर साजरा करणारे शिक्षक म्हणूनही ते नावाजले. त्याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातूनही समाजसेवेचे व समाजप्रबोधनाचे कार्य करतात.
Leave a Review