द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : समाजामध्ये जनजागृती गरजेची असून, विद्यार्थ्यांनी हे काम पुढे न्यावे, असे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मा. ॲड. मोहनराव देशमुख यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्रदूषण नियंत्रण जाणीव जागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात ॲड. देशमुख बोलत होते. यावेळी सहा. सचिव ए. एम जाधव, विज्ञान अधिष्ठाता डॉ. एम.जी. चासकर, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश देशपांडे, कर्मचारी आणि शिक्षक उपस्थित होते.
समाजामध्ये प्रदूषणाची गंभीरता माहिती व्हावी, विद्यार्थ्यांनी या संबंधीची जाणीव जागृती निर्माण करावी या हेतूने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षपूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना डॉ सविता कुलकर्णी यांनी प्रदूषण समस्या, त्याची गंभीरता व जाणीव जागृती यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
डॉ. नितीन घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना २ व ३ डिसेंबर १९८४ साली झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जात असल्याचे सांगितले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि महाविद्यालयातील झाडांची काळजी घेणारे चांगदेव पोमण यांच्या हस्ते झाडांचे पूजन केले. तसेच इ वेस्ट कलेक्शन सेंटरमध्ये महाविद्यालयातील संगणक कचरा टाकण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सविता कुलकर्णी, पवन कर्डक, चांगदेव पोमण यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
Leave a Review