द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : कोरोना काळात कामावरून काढलेल्या त्या 270 कामागारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश त्वरित काढण्याचे निर्देश आज कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी अप्पर कामगार आयुक्तांना दिले. यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सुरू केलेल्या 13 दिवसांच्या उपोषणाची फलश्रुती झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणा संदर्भात अधिवेषणा नंतर चर्चा करू, असे आश्वासन खाडे यांनी दिले आहे.
केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणा विरोधात तसेच कोरोना काळात नोकरी वरून काढलेल्या 270 कामगारांना पुन्हा कामावर परत घ्यावे या मागणीसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले हे गेल्या 13 दिवसांपासून कामगार आयुक्त कार्यालय, पुणे येथे प्राणांतिक उपोषणाला बसले होते. राज्यभरातून या उपोषणाला कामगार संघटनांचा पाठिंबा मिळाला. काल कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी चर्चेसाठी निमंत्रित केल्या नंतर रात्री भोसले यांनी प्राणांतीक उपोषण मागे घेतले होते.
मंगळवारी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता देव सिंगल यांच्या दालनात कामगार मंत्री सुरेश खाडे व कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची बैठक झाली. यावेळी खाडे यांनी कोरोना काळात कामावरून काढलेल्या त्या 270 कामागारांना कामावर घेण्याचे आदेश दिले. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अप्पर कामगार आयुक्त अभय गीते यांनी पुढील निर्णय घ्यावेत, असे निर्देश ही दिले.
बैठकी नंतर यशवंतभाऊ भोसले म्हणाले, या बैठकीमध्ये कामगार मंत्री खाडे यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या असून केंद्रीय कामगार कायद्या संदर्भात विधिमंडळ अधिवेशना नंतर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे आम्ही सुरू केलेल्या लढ्याचे एक पर्व यशस्वी रित्या पार पडले आहे.
या बैठकीला अप्पर कामगार आयुक्त अभय गीते, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदींसह कामगार, संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Leave a Review