अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त वु-सु इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशन तर्फे कराटे स्पर्धा संपन्न

आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन
Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त वु-सु इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या पिंपळे गुरव शाखेच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हास्तरीय ओपन – फुल कॉन्टॅक्ट कराटे स्पर्धा २०२२ मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.


पिंपळे गुरव महालक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेविका शोभाताई आदियाल, उद्योजक माऊली जगताप, माजी नगरसेविका उषाताई मुंडे, माजी नगरसेविका वैशालीताई जवळकर, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, वु-सु मार्शल आर्टचे राजेंद्र कांबळे, उद्योजक महेंद्रसिंग आदियाल, शशिकांत दुधारे, गणेश जगताप, शिवाजी निम्हण, शांताराम पिंजण, वु-सु मार्शल आर्टचे विक्रम मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले, की पिंपळे गुरव परिसरातील लहान मुले आणि मुली स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतील या उद्देशाने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे. कराटेमुळे मुलांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे.

ज्येष्ठ माजी नगरसेविका शोभाताई आदियाल म्हणाल्या, की शालेय मुले आणि मुलींमध्ये स्वतःचे संरक्षण करण्याबाबत आत्मविश्वास, धाडस निर्माण व्हावे, यासाठी पिंपळे गुरव परिसरात कराटे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात, ही स्तुत्य बाब आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत दुधारे यांनी, तर स्पर्धेचे आयोजक राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले.


Share this Newz