माझ्या विजयाचे खरं श्रेय लक्ष्मणभाऊंना… नवनिर्वाचित भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन मानले आभार

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :        राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर यशाचे श्रेय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना जाते, असे वक्तव्य खासदार अनिल बोंडे यांनी केले. या विजयानंतर त्यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी रात्री उशिरा जाऊन त्यांची भेट घेतली.

आमदार लक्ष्मण जगताप यांना भेटून आनंद झाला. मतदानाच्या वेळी माझ्या नावापुढे पहिली पसंती दाखविली आणि त्यांच्यामुळेच हा विजय शक्य झाला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून जे काम केले आहे. त्याबद्दल त्यांना भेटून त्यांचे आभार मानणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. आमदार लक्ष्मण जगताप लवकर बरे होऊन समाजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे, अशी मी प्रार्थना करणार आहे, असे खासदार बोंडे म्हणाले.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते. शुक्रवारी मतदानानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी एक विधान करुन खळबळ उडवून दिली होती. शनिवारी पहाटे लागलेल्या निकालावरुन बोंडे यांचे ‘ते’ विधान खरे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी ‘आम्हीच जिंकू’ असा दावा केला होता. बोंडे यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत, शिवसनेचे उमेदवार संजय पवार यांच्यावर निशाणा साधला होता.“राज्यसभेच्या तीनही जागा आम्हीच जिंकू. आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला त्याप्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणता तरी एक संजय जाणार, असे विधान बोंडेंनी केलं होते.


Share this Newz