भाऊ तुमच्यामुळेच मी परत खासदार झालो… नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :       मुंबईत विजयाचा जल्लोष केल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांनी शनिवारी रात्री आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील ‘चंद्ररंग’ निवासस्थानी भेट दिली. आमदार जगताप व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत तब्बेतीची विचारपूस केली. जगताप कुटुंबियांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांचे औक्षण करून अभिनंदन करण्यात आले.

साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेली राज्यसभेची निवडणूक आणि ज्यांच्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय सुकर झाला, ज्यांचे माजी मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी भरभरून कौतुक केले ते पिंपरी-चिंचवडचे लढवय्ये नेते व आमदार लक्ष्मण जगताप यांची नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांनी शनिवारी (दि. ११) रात्री पिंपळे गुरव येथील ‘चंद्ररंग’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारी आहे”, अशा शब्दांत खासदार मडाडीक यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे आभार मानले. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. पिंपरी-चिंचवडमधील जनतेच्या सेवेसाठी तुम्ही लवकरात लवकर पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करा. पक्षाला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवायचा आहे. अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. आमदार जगताप यांनी खासदारपदी निवड झाल्याबद्दल धनंजय महाडीक यांचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू, माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप, कुटुंबातील सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच दुसऱ्यांदा खासदार होण्याचा माझा मार्ग सुकर झाला. मी जगताप यांच्यामुळे पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. जगताप यांची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती केवळ भाजपसाठीच नाही, तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणादायी व ऊर्जा देणारी आहे.
-धनंजय महाडीक, खासदार


Share this Newz