आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :     चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे गुरुवारी दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आमदार जगताप पिंपळे गुरव येथील आपल्या निवासस्थानी येताच समर्थक, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी सांगितले, की डॉक्टरांची दवा, जनतेची दुवा आणि कार्यकर्ते, हितचिंतकांचे प्रेम व प्रार्थना यामुळेच आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती चांगली झाली. डॉक्टरांनी आमदार जगताप यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये, असे आवाहनही शंकर जगताप यांनी केले.
आमदार लक्ष्मण जगताप हे आजारपणामुळे बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल होते. तेथे त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी आमदार जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस होती. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते गेल्या दीड महिन्यांपासून रुग्णालयात ठाण मांडून होते. अखेर आमदार जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Share this Newz