महात्मा जोतीराव फुले लिखित ‘तृतीयरत्न’ नाटकातील सामाजिकता

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :      साहित्य आणि समाज यांचा संबंध पुरातन आहे. “साहित्यात असा कोणताच घटक नसतो, जो इतर सामाजिक व्यवसायाशी जोडलेला नसतो. संपूर्णत: कलात्मक वाटणाऱ्या एखाद्या कलावस्तूला किंवा कलाव्यवहारालासुद्धा सामाजिक संदर्भ असतो. त्यामुळे कला हे साध्य आहे, साधन नव्हे अशा विधानाला मुळीच बाधा येत नाही. त्यामुळे साहित्याकडे विचार ,मूल्य ,शैली ,भाषा आणि वाङ् मयप्रकार यातल्या प्रत्येक घटकाला सामाजिक संदर्भ असू शकतो. अशा रीतीने साहित्य निर्मिती ही माणसाच्या विस्तृत वांशिक, संस्कृती नकाशाचा एक भाग म्हणून पाहिले जाते. एका साहित्यकृतीवर इतर अनेक पारंपरिक कला, साहित्यकृती, वर्तमानकालीन घटना, ऐकलेले- पाहिलेले- आवडलेले ,उसने घेतलेले असे कितीतरी घटक वारांचे प्रभाव सरळ ,उलटे ,तिरपे पडलेले असतात व ते नैसर्गिकरित्याच तिचा एक भाग बनलेला असतात”. ‘समाजाच्या वाटचालीत निर्माण होणाऱ्या प्रत्येक युगाचे स्वतःचे असे एक खास धैर्य वा सूत्र असते, ते त्या काळात निर्माण होणाऱ्या साहित्यात आपोआप प्रतिबिंबित होत जाते.’ साहित्य आणि समाज यांचे जे सहसंबंध आहेत त्याला महात्मा जोतीराव फुले यांचे ‘तृतीय रत्न ‘(1855 ) नाटक देखील अपवाद नाही.

‘तृतीय रत्न’ या नाटकातील समाज हा एकोणिसाव्या शतकातील आहे. या समाजावर रूढी, प्रथा, परंपरा यांचा पगडा होता. या काळात अस्पृश्यता ,जातीय विषमता पाळली जात होती. स्त्री शिक्षणावर बंदी होती. चार भिंतीच्या आतच स्त्रीला स्वातंत्र्य होते .ब्राह्मणी वर्चस्वाचा पगडा होता ‘तृतीय रत्न ‘नाटक (1855) जोतीराव फुले यांची पहिली साहित्यकृती आहे त्या साहित्यकृती पासून त्यांची लेखनाला सुरुवात झाली आहे. ही साहित्यकृती त्यांनी दक्षिणाप्राईज कमिटस सादर केली होती .पण भिडस्त भट सभासदांमुळे ती मंजूर होऊ शकली नाही याची खंत महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी ‘ग्रंथाच्या निमित्ताने व्यक्त केली आहे ‘.शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हा संदेश त्यांनी या नाटकातून दिला. जेव्हा आपल्या समाजात फार मोठा वर्ग निरक्षर होता, वाचू लिहू शकत नव्हता, तेव्हा सामाजिक प्रबोधनाचा मंत्र फुले यांनी या नाटकाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडला. ‘तृतीय रत्न’ प्रयोगक्षम नाटक असून त्याचे कथानक, पात्रयोजना, प्रसंग ,संवाद हे सगळेच नाट्य व साहित्य या दोन्ही दृष्टीने अतिशय मार्मिक व अर्थपूर्ण आहे .एकूण 28 पृष्ठांचे हे नाटक आहे. या नाटकातून सामान्य माळ्या कुणब्याचे शोषण धर्माच्या नावाखाली कसे केले जाते. याचे दर्शन घडवले आहे .

या नाटकाच्या प्रारंभी महात्मा फुले यांनी जोडलेली टीप नाटकाचा आशय स्पष्ट करते. महात्मा फुले लिहितात “प्रथम माळ्या -कुणब्याचे मूल ते आपल्या आईच्या उदरात कोठे गर्भिवास करू लागल्याचा आरंभ होत आहे. तो ब्राम्हण जोशींची स्वारी येऊन त्या गरीब बाईस मोठमोठ्याने भूलथापा देऊन तिजला द्रव्यहीन कसं करतो याविषयी मी येथे लिहिन.” अज्ञानी शुद्र शेतकर्‍याच्या गरोदर बायकोला जोशी नक्षत्रांची भीती घालतो व दक्षिणा उपटतो,असा नाटकाचा आरंभ आहे.कर्ज काढून शेतकरी जोडपे ब्राह्मणभोजन व धार्मिक विधी करते. ते नाटक घडत असताना शेतकरी कुटुंबाचे अज्ञान, कर्जबाजारीपणा आणि धर्माच्या शोषक रूपाचे दर्शन घडत जाते. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे शेतकरी पती-पत्नीच्या लक्षात येते. आणि महात्मा फुले यांच्या रात्रीच्या शाळेत ते दोघे जाऊ लागतात, असे हे महात्मा फुले यांचे मराठीतील पहिले स्वतंत्र सामाजिक नाटक शिक्षणाची महती पटवून देते.

‘तृतीय रत्न ‘नाटकाच्या शेवटी महात्मा फुले यांनी विधायक समाज सुधारणांवर दृष्टीक्षेप टाकलेला आहे व शूद्रातिशूद्रांना ज्ञानाचा नवा प्रकाश दाखवला आहे. या नाटकातील ख्रिस्ती धर्मोपदेशक हा कुणबी स्त्री व तिचा नवरा यांना फसवेगिरीपासून परावृत्त करणारा व शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा आहे. या नाटकाच्या दृष्टीने शेवटी येणारा संवाद महत्त्वाचा आहे. तो असा “बाईचा नवरा: अगे आज देखील लवकर जेवण आटोप कशी? मघाशी त्या परोपकारी पाद्रीसाहेबांच्या उपदेशावरून व आज घडलेल्या सर्व गोष्टींवरून देवाच्या व धर्माच्या नावा वर आपणासारख्या इतर अज्ञानी माळी, कुणबी इत्यादी शूद्र जातींनी लबाड्या वा भूलथापा देऊन लुबाडून खाण्याचा भट- ब्राह्मणांचा कावा चांगला उघड झाला असून शिवाय विद्या शिकण्याचे महत्त्व ही आज आपणास चांगले कळून आलेळ आहे. म्हणून आपण लवकर जेवण आटोपून आपल्या घरा पलिकडील त्या जोतीराव गोविंदराव फुले यांच्या वाड्यात त्यांची स्त्री सौ.सावित्रीबाई फुले यांनी उपवर स्त्रियांसाठी रात्रीची शाळा घातलेली आहे तीत आज पासून मी जाणे सुरू करितो. या दोन्ही शाळांतून ते दोघे उभयता सर्वांना मोफत शिक्षण देतात .यापूर्वी यांच्या या शाळांत येण्याबद्दल त्या दोघांनी आपणास पुष्कळ वेळा आग्रह केला असता आपण गेलो नाही ही आपण मोठी चूक केली आहे. बाई : जेवावयास बसून ठीक आहे. चला आपण दोघे आज पासून रोज रात्री फुले यांच्या शाळेत जाऊन लिहिणे, वाचणे शिकू म्हणजेच पुढे जगातील सर्व गोष्टी आपणास कळू लागतील”. या ठिकाणचा संवाद नाटक रंगविणे हा भाग तर आहेच, पण त्याहीपेक्षा त्यातून व्यक्त होणारा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा अधिक महत्त्वाचा उद्देश आहे. पात्रांच्या कृतीचे चित्रण करून शिक्षणापासून कसे फायदे होतात हे नेमके पटवून दिले आहे.

‘तृतीय रत्न’ या नाटकात ‘ विदूषक ‘असलेले एक पात्र आहे. तो मुख्यत: जोशीबुवांचे ढोंग चव्हाट्यावर मांडण्याचे काम करतो. प्रबोधन करणे ही त्यांची भूमिका आहे. म्हणूनच सत्य प्रकट करणारे संवाद त्यांच्या तोंडून वारंवार प्रकट होतात. उदाहरणार्थ. “या नांगर हाक्याच्या बायकोला हे काय ठावे, की कुणब्याने नांगर हाकता हाकता विद्या जी शिकली असती तर कदाचित जोशी तर केव्हाच कोणी कडे ढिरीला पाय लावून पळाला असता.” “मोगलाप्रमाणे इंग्रज लोक या देशातील प्रजेला छळतील तर विद्या शिकून शहाणे झालेले शूद्र अतिशूद्र लोक पूर्वी झालेल्या जहाॅंमर्द शिवाजी प्रमाणे आपले शूद्रादी अति शूद्रांचे राज्य स्थापन अमेरिकेतील लोकांप्रमाणे आपला राज्यकारभार आपण पाहतील, पण भटांची ती दृष्टी व नष्ट पेशवाई आता पुढे या देशावर कधीच येणार नाही हे या जोशीबुवांनी पक्के ध्यानात ठेवावे. ” विदूषकाच्या तोंडून व्यक्त होणाऱ्या या संवादात महात्मा फुले यांच्यामधला विचारवंत माणूसच दडून बसला आहे, असे ठामपणे म्हणता येईल.

अशा प्रकारे एकूणच महात्मा फुल्यांच्या काळातील समाज ,रूढी ,प्रथा ,परंपरा ,जातीभेद ,कर्मकांड विशिष्ट वर्गाची मिरासदारी, शिक्षणाचा अभाव त्यामुळे समाज बुरसटलेला होता. या सर्व परिस्थितीची आपल्याला कल्पना येते. समाजाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते त्याचप्रमाणे ‘तृतीय रत्न ‘नाटकाद्वारे जोतीराव फुल्यांनी तत्कालीन समाज कशा पद्धतीचा होता याचा वेध साहित्यात घेतलेला आहे.

– डॉ. नूतन लोणकर –नेवसे,

मु. पो. नायगाव ता. खंडाळा, जि. सातारा.

मो नं. 9623031635


Share this Newz