वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘वृक्षमित्र आदर्श समाजसेवक पुरस्कारा’ने गौरव

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : समाजसेवेचा वसा हाती घेऊन दरवर्षी उन्हाळ्यात हजारो वृक्षांना मोफत पाणी देण्याचे काम करण्यात येत असल्याच्या कामाची दखल घेत पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांना नुकतेच वृक्षमित्र आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती स्थापना व श्री रामनवमीचे औचित्य साधत सुतारवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अरुण पवार यांना जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर, गिरीराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आबासाहेब सुतार, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदुंगाचार्य पांडुरंग दातार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष मारुती महाराज कोकाटे यांचे हस्ते सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वृक्षसंवर्धन हीच देवपूजा असे मानून अरुण पवार यांनी आजपर्यंत 25 हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करीत त्यांची जोपासना केली आहे. देहू, आळंदी, तुळजापूर, उस्मानाबाद, भगवानबाबा गड अशा अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. विशेष म्हणजे फक्त दिखावा किंवा प्रसिद्धीसाठी वृक्ष लागवड केलेली नसून, यातील सर्वांच्या सर्व रोपांचे वृक्षात रूपांतर झाले आहे. अरुण पवार हे सहा फुटांतून अधिक उंचीची रोपे लावतात. आणि पुढील तीन चार वर्षे या वृक्षांना टँकरद्वारे पाणी देऊन ही रोपे जतन केली जात आहेत. आजघडीला अरुण पवार यांचे 5 टँकर झाडांना मोफत पाणी पुरविण्याचे काम करीत आहेत. उन्हाळ्यातही झाडे वाचली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. एकप्रकारे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या माध्यमातून ते पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करीत आहेत.
याबाबत अरुण पवार यांनी सांगितले, की झाडेच हवा शुद्ध करतात. झाडे माणसाला जगण्याची दृष्टी देतात. वृक्षसंवर्धन हीच खरी देवपूजा आहे, या संकल्पनेतून दरवर्षी जानेवारी ते पाऊस पडेपर्यंत वृक्षांना टँकरद्वारे मोफत पाणी दिले जाते. यंदाही गेल्या जानेवारीपासून वृक्षांना मोफत पाणी देण्याचा उपक्रम सुरू असून, दररोज पाच टँकरद्वारे पाणी देण्याची सेवा केली जात आहे. यासाठी मराठवाडा जनविकास संघासोबतच वैष्णवी फुड इंडस्ट्रीज, वृक्षदाई  प्रतिष्ठान आणि भंडारा डोंगर ट्रस्ट समिती यांच्या संयुक्तपणे वृक्ष जपण्याचे सामाजिक कार्य करीत आहेत.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात झाडांसाठी यु. पी. व्ही. सी. पाईपलाईनच्या माध्यमातून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरविले जात आहे. तसेच देहुगाव गायरान या ठिकाणीही ठिबकद्वारे वृक्षांना जीवनदान दिले जात आहे. याशिवाय वन्य प्राण्यांसाठीही जंगलाच्या कडेला सिमेंटचे हाऊद ठेवून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे हरीण, माकडे, मोर, अन्य पशू पक्षी यांची तहान भागवण्याचे काम वृक्षमित्र अरुण पवार करीत आहेत.

Share this Newz