खराबवाडी (प्रतिनिधी): खराबवाडी ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणाऱ्या गढूळ व दूषित पाण्यामुळे सारा सिटी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यामुळे लहान मुले, महिला, तसेच ज्येष्ठ नागरिकांना जुलाब व उलट्यांचे त्रास मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. मात्र, मुजोर ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
पाण्याच्या दूषित पाण्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. नळांद्वारे येणारे पाणी स्पष्टपणे गढूळ व दूषित असल्याचे आणि त्याला दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे दिसत असतानाही खराबवाडी ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
वर्षभर अपुरा पाणीपुरवठा, तरीही पाणीपट्टी वसुली :
खराबवाडी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करत असल्याचे चित्र उभे करत असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. सारा सिटीला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. असे असतानाही फ्लॅटधारकांकडून पाणीपट्टी वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. ही अन्यायकारक परिस्थिती गेल्या पाच वर्षांपासून कायम असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. प्रशासनाकडून तातडीने पाणीपुरवठ्याची तपासणी करून स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही सारा सिटीतील रहिवाशांनी दिला आहे.
सारा सिटीतील रहिवासी :
“गेल्या काही दिवसांपासून नळाला येणारे पाणी अत्यंत गढूळ असून त्याला दुर्गंधी येत आहे. हेच पाणी वापरल्यामुळे घरातील लहान मुलांना जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही.”
महिला रहिवासी:
“ पाणी स्वच्छ नसल्यामुळे आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मात्र, तरीही ग्रामपंचायतकडून पाणीपट्टी भरण्याचा तगादा लावला जातो. ही सरळ सरळ लूट असून आरोग्याशी खेळ केला जात आहे.
ज्येष्ठ नागरिक:
“पाच वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. पाणी येत नाही, आले तरी ते दूषित असते. आता तर आजार बळावत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.”
स्थानिक डॉक्टर:
“दूषित पाणी पिल्यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप अशा आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. सध्या सारा सिटी परिसरातून अशा रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तातडीने पाणीपुरवठ्याची तपासणी करून शुद्ध पाणी उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे.”
आरोग्य तज्ज्ञ:
“गढूळ व जीवाणूयुक्त पाणी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरण्याचा सल्ला आम्ही नागरिकांना देत आहोत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.”







Leave a Review