द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनबद्ध अशा सामन्यांमध्ये कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन होताना दिसत आहे. या सामन्यांचे उत्तम नियोजन अजय दुधभाते, मनीष कुलकर्णी, निलेश जगताप यांनी केले आहे.
आमदार क्रिकेट चषक स्पर्धेतील मैत्रीपूर्ण रंगतदार सामन्यात रविवारी सकाळी आठ वाजता पत्रकार विरुद्ध सांगवी पोलीस यांचा सामना घेण्यात आला होता. या मैत्रीपूर्ण सामन्यात सांगवी पोलीस संघ विजयी झाला. यात पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पत्रकार संघासमोर मोठी धावसंख्या उभारली. त्याचा पाठलाग करत पत्रकार संघानेही कडवी झुंज देत फलंदाजी केली. मात्र, विजयी धावसंख्या उभारण्यात पत्रकार संघ अपयशी ठरला.
कर्णधार मिलिंद संधान यांनी उत्तम गोलंदाजी करताना सांगवी पोलिस संघातील दोन फलंदाज बाद केले. पत्रकार संघाने सांगवी पोलीसांच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देत शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. यावेळी महादेव मासाळ यांनी १६ चेंडूत २ चौकारासह २१ धावांची खेळी केली. तर संदीप सोनार यांनी १४ चेंडूत ८ धावा केल्या. सामन्यात संतोष महामुनी यांनी महादेव मासाळ यांना रनर म्हणून मोलाची साथ दिली.
मैत्रीपूर्ण अशा सांघिक खेळात पत्रकार संघातील सागर झगडे, ज्ञानेश्वर टकले यांनी उत्तम गोलंदाजी करीत सांगवी पोलिसांची धावसंख्या रोखण्यात यश मिळविले. विजय गायकवाड यांनी यष्टीरक्षक भूमिका पार पाडली. रमेश मोरे (उपकर्णधार), देविदास शेलार, प्रकाश जमाले, बलभीम भोसले यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. अशोक जमाले, संगीता पाचंगे, संजय मराठे, प्रज्ञा दिवेकर, राजश्री पवार यांनी पत्रकार संघाला प्रोत्साहित केले.
या खेळात उत्तम फलंदाजी व गोलंदाजी करत पोलिस संघाने विजय मिळवला. सांगवी पोलीस संघातील फलंदाज दिलीप जाधव यांनी ३५ धावा करत मॅन ऑफ द मॅच किताब पटकवला. अजय दुधभाते, दिपक मंडले, प्रदिप गुळमिरे आदी सहकाऱ्यांनी परिसरातील क्रिकेट रसिकांसाठी सुसज्ज सुविधापूर्ण अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन व नियोजन केले आहे. त्याबद्दल क्रिकेट खेळाडू व प्रेक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.







Leave a Review