घोलप महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उद्बोधन उपक्रम

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

नव्याने राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी व राष्ट्रीय सेवा योजना संकल्पना माहीत होण्याच्या उद्देशाने प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड क्रॉस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवकांसाठी एकदिवसीय उद्बोधन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी रेड क्रॉस पुणे जिल्हा शाखेचे मानद सचिव डॉ. दिलीप परदेशी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. सद्दाम हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्रा. अमृता इनामदार यांनी रा.से.यो. स्वंयसेवकांकरिता आयोजित उद्बोधन उपक्रमाची संकल्पना व महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांसमोर विशद केले. ज्युनिअर रेड क्रॉस, पुणे जिल्हा शाखेचे मानद सचिव डॉ. दिपक परदेशी यांनी सर्वप्रथम युवकांनी ध्येय दृष्टीने काम करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत समाज उभारणीमधील युवकांच्या योगदानाबद्दल उपस्थित स्वयंसेवकांशी सविस्तर चर्चा केली. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून रेड क्रॉस संस्था संपुर्ण जगभरामध्ये करत असलेल्या कार्याचा दाखला देत रेड क्रॉस संस्थेची स्थापना, उद्दिष्टे, तत्वे, कार्य पद्धती यावर सादरीकरणासह भाष्य केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी समाजहितासाठी काम करत असताना विद्यार्थ्यांनी स्वंयप्रेरणेने व स्वेच्छेने आपले भूमिका निभावली पाहिजे असे स्पष्ट करत कोविड काळामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदलेल्या शिक्षणपद्धतीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच आपल्याला मिळणाऱ्या माहितीचे ज्ञानात रुपांतर केल्याशिवाय त्याचा उपयोग होणार नाही, असे नमुद करत जीवनात येणार्‍या अडचणींना खंबीरपणे सामोरे जाण्याचे आवाहन स्वयंसेवकांना केले. त्याचबरोबर ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास’ या विषयावर माहितीपूर्ण सादरीकरणासह मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना व संकल्पना, उद्दिष्टे व मार्गदर्शक तत्त्वे, संस्थात्मक रचना, नियमित कार्यक्रम, वार्षिक शिबिरे, पर्यावरण संवर्धन उपक्रम, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम याबद्दल माहिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सद्दाम हुसेन यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. चालू शैक्षणिक वर्षाकरिता पदवी व पदव्युत्तर वर्गातील सुमारे ३५० स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेसाठी नोंदणी केली आहे. तसेच सध्या कोविड – १९ चा धोका वाढलेला असताना व मर्यादीत प्रवेश संख्येमुळे सर्व स्वयंसेवकांचे उद्बोधन व्हावे यासाठी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या कल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या उपक्रमाचे झुम अॅप व यु – ट्युब लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कोविड – १९ विषयक शासन नियमांचे काटेकोर पालन करत १२० व ॲानलाइन पद्धतीने २३० असे ३५० स्वयंसेवक उपस्थित होते.

सदर उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र वडशिंगकर, तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विजय बालघरे, प्रा. सचिन भोसले, प्रा. सोनल कदम, प्रा. अनुपमा कदम, प्रा. किर्ती करंजावणे, प्रणित पावले, वीरेन चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


Share this Newz