उद्योजकता विकास केंद्रा अंतर्गत घोलप महाविद्यालयाची निवड

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजकता विकास केंद्र’ अंतर्गत संपूर्ण राज्यभरातुन निवडण्यात आलेल्या पहिल्या ५० महाविद्यालयामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाची निवड झाली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले कि, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन स्तरावर उद्योजकीय कौशल्य वाढीस लागावी, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे इंक्युबेशन सेंटरसाठी महाविद्यालयाने अर्ज केला होता. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यामध्ये ५० महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून यामध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचा समावेश झाला आहे, असे नमूद करत उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य वाढवण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असेल असे स्पष्ट केले.

प्राचार्य डॅ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील उद्योजकता विकास केंद्र समन्वयक डॉ. नरसिंग गिरी व डॅा. क्रांती बोरावके यांनी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

मागील काही काळापासून प्लास्टिक संकलन अभियान, स्वच्छता मोहीम, लसीकरण असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या घोलप महाविद्यालयाच्या शिरपेचामध्ये उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत अजून एक मानाचा तुरा रोवल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Share this Newz