घोलप महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. घोरपडे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आरोग्य जनजागृती

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे

नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यामध्ये आघाडीवर असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींसाठी लैंगिक व प्रजनन पद्धतीविषयी माहिती देणार्‍या विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

औंध जिल्हा सामान्य रुग्णालय व महाविद्यालयातील आरोग्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानात राष्ट्रीय किशोर – किशोरी स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पुणे जिल्हा समन्वयक व समुपदेशक कांचन सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, सकाळ सत्र प्रमुख डॉ. वंदना पिंपळे, समिती समन्वयक डॉ. वैशाली बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना आरोग्य समिती समन्वयक डॉ. वैशाली बनसोड यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनीसाठी आयोजित या कार्यक्रमाचे उद्देश व महत्त्व विशद केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रसंघातर्फे साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची संकल्पना स्पष्ट केली. तसेच महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करत महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देणे या दिनाचे उद्दिष्ट आहे, असे नमूद करत विद्यार्थीदशेतील शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगितले.

कांचन सावंत यांनी सर्वप्रथम लैंगिक शिक्षणाबद्दल काम करत असताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडत वयात आल्यानंतर मुलींमध्ये होणार्‍या विविध शारिरिक बदलांविषयी माहिती दिली. तसेच मासिक पाळी, शारिरीक आकर्षण व संबंध, प्रजनन क्षमता व गर्भधारणा, किशोर वयातील मुलींच्या आवडी निवडी इत्यादी महत्वाच्या घटकांवर चर्चा करत टिव्ही मालिका व सोशल मीडिया यांचा लैंगिकतेच्या कल्पनेवर होणारा परिणाम स्पष्ट केला. त्याचबरोबर वाढत्या वयाबरोबर मुलांचा पालकांशी असलेला संवाद तुटत जातो, अशी खंत व्यक्त करत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पालकांसमोर मनातील भावना उलगडत संवाद साधणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

प्रा. दिपाली चिंचवडे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. विजय घाडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या तांत्रिक यशस्वीतेसाठी प्रा. सोनल कदम, सचिन शितोळे, वीरेन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.


Share this Newz