The Newz Biz Team, PIMPRI
पिंपळे गुरवच्या जवळकर नगरमधील महाराष्ट्र कॉलनी लेन क्रमांक चार येथील जया सूर्यकांत कुरुलकर यांनी गौरी गणपतीची सजावट आकर्षक केली असून, यंदा त्यांनी ‘शेतकरीसुद्धा कोरोनायोद्धा’ ही थीम ठेवली आहे. परिसरातून या देखाव्याचे कौतुक होत आहे.

कुरूलकर कुटुंबीय दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन गौरी गणपती समोर सजावट करीत असते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी केंद्रबिंदू ठेवून त्याप्रकारे सजावट केली आहे. शेतजमीन, विविध पिके, गाई गुरे, गाईंचा गोठा असं सर्वकाही सुंदररित्या साकारले आहे. कोरोना काळात सर्वकाही बंद असताना शेतकऱ्याने मात्र कोरोनाची भीती असतानादेखील अगदी शहरापर्यंत भाजीपाला, धान्ये, दूध पोहोचवून सर्वांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेतली.
अगदी महापूर असतानाही फळे, भाजीपाला, धान्य, दूध नागरिकांपर्यंत पोहोचविले. त्यामुळे याच शेतकऱ्याला खरा कोरोनायोद्धा म्हणून गौरविले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. हाच धागा पकडून जया सूर्यकांत कुरूलकर यांनी शेतकरीही खऱ्या अर्थाने कोरोनायोद्धा आहे, याकडे लक्ष वेधले. सोबतच सर्वांनी कोरोनाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कुरूलकर कुटुंबियांनी साकारलेला हा देखावा पाहण्याजोगा आहे.








Leave a Review